उद्धव ठाकरेंचा 'खास माणूस' मंत्रिमंडळात, अनिल परब यांनी घेतली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:43 PM2019-12-30T15:43:29+5:302019-12-30T15:44:13+5:30

महाआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी त्यांनी शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली.

Uddhav Thackeray's 'special' man in the cabinet, Anil Parab oath minister in thackarey sarkar | उद्धव ठाकरेंचा 'खास माणूस' मंत्रिमंडळात, अनिल परब यांनी घेतली शपथ

उद्धव ठाकरेंचा 'खास माणूस' मंत्रिमंडळात, अनिल परब यांनी घेतली शपथ

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून आमदार व विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांची ओळख आहे. सीएमओ कार्यालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना कार्यभार मिळण्याची चर्चा शिवसेना वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडणारे, संघटन कौशल्य आणि निवडणूकीचे यशस्वी तंत्र राबवण्यात ते माहिर आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अनेकवेळा शिवसेनेची बाजू प्रभावीपणे मांडली आहे.

महाआघाडीचे सरकार राज्यात आणण्यासाठी त्यांनी शिवसेनेची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली. गेल्या 26 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला. महाआघाडी सरकारने 169 आमदारांचे बहुमत विधानसभेत सिद्ध केले. आणि उद्धव ठाकरे यांच्या रूपाने शिवसेनेचा तसेच ठाकरे घराण्याचा पहिला मुख्यमंत्री राज्यात विराजमान झाला. ठाकरे कुटुंबातील युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभेची निवडणूक लढवावी असे सूतोवाच त्यांनी वरळी येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यात सर्वप्रथम केले होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवली ते भरघोस मतांनी निवडून आले. आज आदित्य ठाकरे हेदेखिल कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांच्याबरोबर शपथ घेत आहेत.

अॅड व डॉ.अनिल परब.. 
शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी तसेच कायद्याचे अचूक ज्ञान असणारे व गृहनिर्माणच्या प्रश्नांवर डॉक्टरेट प्राप्त करणारे अनिल परब यांचा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, तर शिवसैनिकांच्या आनंदाला उधाण आले. 

पार्श्वभूमी
वांद्रे पूर्व गांधीनगर येथे इमारत क्रमांक 58 मध्ये लहानाचे मोठे झालेले भारतीय विद्यार्थी सेनेचे काम करत असताना वांद्रे परिसरात राहणारे  शिवसेनेचे माजी खासदार दिवंगत मधुकर सरपोतदार यांचे चिरंजीव दिवंगत अतुल सरपोतदार यांच्या बरोबरीने अनिल परब यांनी कामाला सुरुवात केली. पुढे सरपोतदारांच्या प्रत्येक निवडणूकीत मुख्य भूमिका निभावत वांद्रे पूर्व परिसरात आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यावेळी शिवसेनेत केवळ बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून ओळख असणारे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात अनिल परब आले आणि आता पंचवीस वर्षांत उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून मंत्रिमंडळात सामिल झाले.
सन 1995 च्या युतीच्या सत्ताकाळात वांद्रे खेरवाडी मतदार संघाचे उपविभागप्रमुख म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या कार्याला सुरुवात केली. कायद्याचे अचूक ज्ञान असणारे अनिल परब हे त्यावेळी बाळासाहेबांना व उध्दव ठाकरे यांना संघटना वाढीसाठी अभिप्रेत असलेले काम करीत होते. मुंबई विद्यापीठाची निवडणूक असो वा मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक, अनिल परब निवडणूकीची धोरणात्मक आखणी करीत असे. विनायक राऊत यांच्या विभागप्रमुखांच्या काळात उपविभाग प्रमुख असलेल अनिले परब पुढे तुकाराम शेलारांच्या अल्पजीवी कारकिर्दीनंतर 2001 ला शिवसेना उत्तर पश्चिम विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम पाहू लागले. जसजशी उद्धव ठाकरेंची शिवसेनेत मांड घट्ट बसू लागली तसतशी अनिल परब व मातोश्री यांचे संबंध दृढ होत गेले. 

पूर्वीच्या बीएमईएसच्या वीजदर वाढीविरोधात उपनगरात 2003-04 साली झालेले आंदोलन यशस्वी करण्यामागे अनिल परब यांची कार्यपद्धती होती हे मातोश्रीच्या लक्षात येवू लागले. दरम्यान उध्दव ठाकरे यांचा विश्वास संपादन करण्यात अनिल परब कमालीचे यशस्वी झाले. त्याच काळात विभागप्रमुख पदानंतर अवघ्या 3 वर्षांच्या काळात पहिल्यांदा विधानपरिषदेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले. पुढे नारायण राणे यांच्या बडतर्फीनंतर खुद्द राणे यांनी पत्रकार परिषदेत मिलिंद नार्वेकर यांच्या नंतर अनिल परब विधीमंडळात व शिवसेनेच्या कार्यामध्ये कशी भूमिका निभावतात हे उपहासाने विषद केले होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांनां आंदोलनावेळी झालेल्या केसेसमध्ये स्वखर्चासहित मदत करणे हे त्यांचे आवडते काम, याच कारणामुळे त्यांची लोकप्रियता शिवसैनिकांमध्ये टिकून आहे. त्याच बरोबरीने पक्षाच्या नियमितपणे शिवतीर्थावर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यावरील ध्वनीप्रक्षेपक कायद्याच्या आडकाठी शिथील करण्यात व त्यासाठी लागणाऱ्या कोर्टाच्या लढाईत अनिल परब यांचे योगदान खूप मोठे आहे. 19 वर्षांच्या विभागप्रमुख पदाच्या व तिसऱ्या विधानपरिषद सदस्य पदाच्या कार्यकाळात रस्त्यावरील आंदोलनात, सर्व प्रकारच्या निवडणुकीच्या कामाची आखणी करण्यात व विधीमंडळात शिवसेनेची भूमिका ठळकपणे मांडण्यात अनिल परब यांचा हातखंडा आहे, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. 

2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची भूमिका मुंबईकरांमध्ये ठसविण्यात तसेच संपूर्ण काळात भाजपाला अंगावर घेऊन महापालिकेत विश्वनाथ महाडेश्वर यांच्या रूपाने शिवसेनेचा महापौर बसविण्यात अनिल परब यांचा मोठा वाटा आहे. मनसेचे 6 नगरसेवक पक्षामध्ये घेऊन सेनेचे पालिकेतील बळ वाढविण्याचे श्रेयदेखील निःसंशयपणे अनिल परब यांच्याकडेच जाते. अगदी आत्ताच्या महिन्यापूर्वीच्या सत्तांतराच्या नाट्यानंतर सुप्रिम कोर्टात शिवसेनेच्या वतीने केस दाखल करण्यापासून तेथील वकीलांबरोबर कायद्याची मांडणी करुन पक्षाला महाराष्ट्रात सरकार स्थापण्याचा मार्ग प्रशस्त करुन दिला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्यात शिवसेनेच संसदीय गटनेते व खासदार संजय राऊत यांच्या खालोखाल अनिल परब यांचा देखील वाटा आहे, हे मान्य करावे लागेल. 
 

Web Title: Uddhav Thackeray's 'special' man in the cabinet, Anil Parab oath minister in thackarey sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.