Join us
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश महाजनांसारख्या आरतीबाज लोकांपासून सावध राहा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 07:58 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. महाजन यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध राहण्याचा सल्ला देऊ केला आहे.

ठळक मुद्दे'गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले''आम्हाला व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच'दैवी चमत्कार नसून सत्ता व पैशांचाच खेळ आहे हे गिरीशभाऊंइतके दुसरे कोणाला समजणार?

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. महाजन यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध राहण्याचा सल्ला देऊ केला आहे.''महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे. ते आम्हाला व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच'', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून महाजनांवर टीका केली आहे. 

(युतीचा 'नगारा' वाजला!; मुख्यमंत्री व उद्धव ठाकरेंनी एकमेकांवर उधळली स्तुतिसुमने)सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे - मुख्यमंत्री फडणवीस यांचे खास भगतगण मंत्रिमहोदय गिरीश महाजन यांनी अशी पंचारती ओवाळली आहे की जगातील सर्व जंतरमंतर, जादूटोणावाले भूमिगत झाले आहेत. अडचणींमधून मार्ग काढण्याची मुख्यमंत्र्यांना ‘दैवी’ शक्ती प्राप्त झाल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. दैवी शक्तीच्या आधारे मुख्यमंत्री कारभार करीत असून विधानसभा, कॅबिनेट वगैरे सर्व बिनकामाचे आहे, हा त्याचा दुसरा अर्थ होतो. -  मराठय़ांना 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिमतीने घेतला. (त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन केले आहे.) - मुळात ज्या प्रकारचा सामाजिक, राजकीय दबाव राज्यात मराठा समाजाने निर्माण केला होता तो पाहता त्यांना ‘आरक्षण’ नाकारणे किंवा खोळंबून ठेवणे ब्रह्मदेवालाही शक्य नव्हते. फडणवीस यांच्या जागी इतर कोणी असते तरीही त्यांना ते करावेच लागले असते. हा निर्णय सरकारचा, संपूर्ण मंत्रिमंडळाचा होता. त्यामुळे महाजन यांनी जे दैवी अवताराचे भाष्य केले ते हास्यास्पद ठरते. - एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते व त्यानंतर महाराष्ट्राचे प्रमुख मंत्री असताना तेदेखील अंगात संचारल्यासारखेच वागत-बोलत असत, पण फडणवीस यांनी खडसे यांची ‘पॉवर’ काढून घेताच त्यांच्यातील दैवी संचारही संपला व ते आता मुक्ताईनगरात वाती वळत बसले आहेत.- मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ‘पॉवरबाज’ आशीर्वादाचा हात गिरीश महाजन यांच्या खांद्यावर ठेवल्याने त्यांनाही आज संचारल्यासारखे वाटत असावे, पण 2019 च्या आधी महाराष्ट्राची ‘पॉवर कट’ होऊ शकते आणि या भारनियमनाची सुरुवात आता झाली आहे. - मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील महानगरपालिकांचे निकाल भाजपच्या बाजूने लावून घेतले हा दैवी चमत्कार नसून सत्ता व पैशांचाच खेळ आहे हे गिरीशभाऊंइतके दुसरे कोणाला समजणार? - निवडणुका जिंकणे व इतर काही किडुकमिडुक कामात ‘यश’ विकत घेणे हा दैवी चमत्कार नसून भ्रष्टाचार आहे व त्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची आर्थिक अवस्था साफ ढासळली आहे. महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे. - राज्यातील देवस्थानांच्या पेटय़ा फोडून सरकार चालवायचा निर्णय त्यांनी घेतला आहे. शिर्डी संस्थानने रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करायला सरकारला 500 कोटी रुपये दिले. जनतेचा पैसा देवाच्या तिजोरीत जातो व हा पैसा आता सरकार चालविण्यासाठी वापरला जातो.  - दैवाने मोदी सरकारला भरभक्कम बहुमत दिले व दैवी पुरुष नरेंद्र मोदी सिंहासनावर विराजमान झाले, पण ना कश्मीरचा प्रश्न सुटला ना अयोध्येत राममंदिर उभे राहिले. समान नागरी कायदा वगैरे तर लांबच राहिले. - दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! - गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे-धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे, त्यांच्या प्रतिमेस हे शोभणारे नाही. ते आम्हाला व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसगिरीश महाजन