Uddhav Thackeray: तुम्ही कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत; मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 08:26 PM2021-04-04T20:26:56+5:302021-04-04T20:27:04+5:30

Uddhav Thackeray: ( You take responsibility for the workers; CM Uddhav Thackeray appeal to the business world)

Uddhav Thackeray: You take responsibility for the workers; CM Uddhav Thackeray appeal to the business world | Uddhav Thackeray: तुम्ही कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत; मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

Uddhav Thackeray: तुम्ही कामगारांची जबाबदारी घ्या, सरकार तुमच्यासोबत; मुख्यमंत्र्यांचे उद्योग जगताला आवाहन

Next

मुंबई: वाढता कोविड प्रादुर्भाव पहाता उद्योग जगताने काही कालावधीसाठी कारखान्यात आवश्यकते एवढेच कामगार बोलवावेत, प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उद्योगांना त्यांच्या कारखान्याच्या आवारातच कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे ती त्यांनी करावी, जिथे वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे तिथे ते केले जावे, जो कामगार कोविड बाधित होईल त्या कामगाराच्या भले ही तो कंत्राटी कामगार असेल त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांची  रोजीरोटी चालू राहील याची काळजी घ्यावी असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड विरोधात लढतांना एका कुटुंबाप्रमाणे आपण एकत्रितरित्या या संकटाला सामोरे जाऊ आणि त्यावर मात करू असे आवाहन  केले.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतांना उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्री यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही उपस्थितांनी दिली. सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने शासन जो निर्णय घेईल त्याला सहकार्य करण्याची उद्योग जगताची तयारी असल्याचे उपस्थितांनी सांगितले.  त्यांनी 24x7 लसीकरण व्हावे, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे, निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांना कडक दंड लावावा, शिस्तबद्ध वर्तणुक राहील यासाठी कडक नियमावली तयार करावी,  लोकांचा रोजगार सुरु राहील हे पहावे, जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम च्या सुचना द्याव्यात अशा विविध अपेक्षा व्यक्त केल्या तसेच शासन कोविड नियंत्रणासाठी करत असलेल्या अथक प्रयत्नांचेही उद्योग जगतातील प्रतिनिधींनी अभिनंदन केले.

Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद?, नक्की जाणून घ्या!

कोविडच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांसमवेत दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, उद्योग विभागाचे डॉ. पी अन्बल्गन, यांच्यासह उद्योजक सर्वश्री. उदय कोटक, अजय पिरामल, सज्जन जिंदाल, बाबा कल्याणी, हर्ष गोयंका, निखिल मेस्वानी, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, अपुर्व भट्टाचार्य, हर्ष गोयंका, बोमन इराणी, राजीव रस्तोगी, संजीव बजाज, मनदीप मोरे, इशान गोयल, अमित कल्याणी, अपूर्व देशपांडे, जफर खान, राजेंद्र गाडवे, आनंद गांधी, सिद्धार्थ जैन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.  बैठकीत सुरुवातीला प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविडस्थिती आणि करण्यात येत असलेल्या उपायययोजनांची माहिती  उपस्थितांना दिली.

Lockdown in Maharashtra: राज्य सरकार मधल्या काळात गाफिल राहिल्याने ही वेळ आली- देवेंद्र फडणवीस

अमूल्य सहकार्य... अथक् प्रयत्न

अनर्थ रोखायचा तर  अर्थचक्र बाधित होते आणि अर्थचक्र सुरु ठेवायचे तर अनर्थ होतो या कात्रीत आपण सापडले असून या  संकटकाळात मित्र होऊन सोबत राहणे महत्वाचे असते, राज्यातील उद्योग जगताने नेहमीच मित्रत्वाच्या भावनेने शासनास आतापर्यंत मदत केली आहे, सहकार्य केले आहे त्याबद्द्ल त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, जिंदाल उद्योग समूहाने पुढे येऊन ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी शासनाला सहकार्याची भूमिका घेतली आहे. बाबा कल्याणी यांनी व्हेंटिलेटर्सची निर्मितीच नाही तर ते वापरण्याचे प्रशिक्षण आरोग्य कर्मचारी आणि तंत्रज्ञांना देण्याची तयारीही दाखवली आहे. ही मदत अमूल्य आहे. 

काही उद्योजकांनी त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेण्याचीही तयारी दाखवली आहे. आपण सगळ्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानांकडे तशी विनंतीही केली आहे. आपल्याच राज्याने 45 वर्षांवरील नागरिकांचे सरसकट लसीकरणाची मागणी केली होती. आता तुमची राज्यातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची मागणीही पंतप्रधानांपर्यंत पोहोचवू तसेच त्यासाठीच्या वाढीव लसींच्या डोसची मागणी करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

24x7 लसीकरणाची राज्याची तयारी

प्रचंड वेगाने वाढणारा प्रादुर्भाव रोखणे ही आताची सर्वोच्च प्राधान्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी लसीकरणामुळे घातकता कमी होते हे ही स्पष्ट केले. राज्याची 24x7 लसीकरणाची तयारी आहे. जिथे 20 बेडस आहेत त्या आरोग्य केंद्रात लसीकरणाची परवानगी घेण्यात आली आहे. लसीकरण करतांना लसीची सुरक्षितता ही महत्वाची आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या देखरेखीत लसीकरणाला प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.

काही कडक निर्बंधांची निश्चित गरज

शासन लॉकडाऊनच्या बाजूने नाही, इंडस्ट्री चालू राहिलीच पाहिजे परंतू ती चालू ठेवतांना काही कडक नियम लावणे ही गरजेचे असल्याचे ते म्हणाले. काही उद्योजकांनी स्थानिक वस्त्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक वर्तन होण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक होऊन काम  करण्याचीही तयारी दाखवल्याबद्दल आभार व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना त्यांच्या कामगारांना मास्क लावण्याची शिस्त लावण्याचे, त्यांच्या वेळोवेळी कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन केले. हम सब एक है या भावनेने पुढे जातांना मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांचा एक ग्रुप तयार करण्याच्या सुचना मुख्य सचिवांना दिल्या. उद्योजकांच्या अपेक्षा आणि मागण्या समजून घेऊन वेळोवेळी त्यांच्याशी या ग्रुपद्वारे संवाद साधला जावा असेही ते म्हणाले. 

परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी...

ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीसाठी पुढे येणाऱ्या उद्योजकांचे आभार व्यक्त करून उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले की, प्रादुर्भाव एवढ्या वेगाने वाढतो आहे की येणाऱ्या काही दिवसात आपण आरोग्य सुविधा उभ्या केल्या तरी आरोग्यविषयक डॉक्टर्स, तज्ज्ञ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी जाणवणार आहे. मागच्यावेळी आपण केरळसारख्या राज्यातून डॉक्टर्स मागवले परंतू यावेळी अनेक राज्यात प्रादुर्भाव असल्याने तिथून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. उद्योग जगत यासाठी सहकार्य करीलच परंतू असे करतांना त्यांनी त्यांच्या कामगारांचीही काळजी घ्यावी असेही ते म्हणाले.

कॉर्पोरेट कंपन्यांच्या रुग्णालयांनी तयारी दाखवल्यास ज्या कॉर्पोरेट कंपन्यांची रुग्णालये आहेत त्यांनी पुढे येऊन लसीकरणाची तयारी दाखवल्यास  त्यांना लसीकरणाची परवानगी देण्याबाबत केंद्र सरकारची मंजूरी घेऊ असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच त्यांनी बाबा कल्याणी यांचा व्हेंटिलेटर्स उत्पादन आणि प्रशिक्षण, जिंदाल यांचा ऑक्सीजन निर्मिती आणि पुरवठा याबाबतचा सहकार्याचा हात मोलाचा आणि स्वागतार्ह असल्याचे म्हटले.

अमित देशमुखांकडून स्वागत

अमित देशमुख यांनी ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर्सच्या उत्पादनांसाठी उद्योजक स्वत:हून पुढे आल्याबद्दल धन्यवाद दिले.

ऑक्सीजनच्या वाहतूकीसाठी मदत करावी  - मुख्य सचिव

मुख्य सचिव श्री. कुंटे यांनी श्री. जिंदाल यांच्या ऑक्सीजन निर्मितीच्या निर्णयाचे स्वागत करतांना  दुर्गम ग्रामीण भागात  लिक्विड ऑक्सीजन पुरवठा होण्याच्यादृष्टीने त्याच्या वाहतूकीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Web Title: Uddhav Thackeray: You take responsibility for the workers; CM Uddhav Thackeray appeal to the business world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.