Uddhav Thackeray: स्वाभिमान सभेला तेजस ठाकरेंची दमदार एन्ट्री, शिवसेनेत लाँचिंग झाल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 08:00 IST2022-06-09T07:58:41+5:302022-06-09T08:00:58+5:30
या सभेत तेजस ठाकरेही भगवं उपरणं गळ्यात घालून दिसले.

Uddhav Thackeray: स्वाभिमान सभेला तेजस ठाकरेंची दमदार एन्ट्री, शिवसेनेत लाँचिंग झाल्याची चर्चा
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेतून हिंदुत्त्वाचा हुंकार देत भाजपला लक्ष्य केलं. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांमुळे आज देशावर नामुष्कीची वेळ आली. बेताल वक्तव्य करणाऱ्या या प्रवक्त्यामुळे देश माफी मागणार नाही. कारण, भाजपचा प्रवक्ता हा देशाचा प्रवक्ता नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंच्या या सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले. नामांतराच्या मुद्द्यावरुन केंद्रस्थानी असलेल्या या सभेला मोठी गर्दी होती. तर, शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती होती. या सभेत तेजस ठाकरेही भगवं उपरणं गळ्यात घालून दिसले.
औरंगाबादेतील सभेसाठी मुंबईतून शिवसेनेचे दिग्गज नेते हजर होते. तर, संपूर्ण ठाकरे कुटुंबही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे असे संपूर्ण ठाकरे कुटुंब या सभेला उपस्थित होते. नेहमीच राजकीय कार्यक्रमापासून आणि राजकारणापासून दूर राहणारे तेजस ठाकरे या सभेत भगवं उपरणं परिधान करुन मंचावर दिसून आले. आपल्या आई शेजारी ते वडिलांची, शिवसेना पक्षप्रमुखांची सभा ऐकायला आले होते. त्यामुळे, त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. तर, आदित्य ठाकरेंचं मुंबईत लाँचिंग झाल्यानंतर तेजस ठाकरेंचं औरंगाबादेतून शिवसेनेनं लाँचिंग केलंय, अशी चर्चाही सभास्थळी रंगली होती.
तेजस ठाकरे यांनी २०१९ मध्ये आदित्य ठाकरे जेव्हा वरळी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले होते, त्यावेळी ठराविक रॅलींना प्रचारासाठी हजेरी लावली होती. तर, राणा दाम्पत्यांनी शिवसेनेला दिलेल्या आव्हानानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. येथे रात्रभर शिवसैनिकांचा मातोश्रीवरील ओघ सुरूच होता. त्यावेळी, तेजस यांनी मध्यरात्री मातोश्रीबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी जेवणाची आणि पाण्याची विचारपूस तेजस ठाकरेंनी केली होती.
दरम्यान, तेजस हे वन्यजीव प्रेमी आहेत. सध्या त्यांची आवड ही वाईल्डलाईफकडेच आहे. त्यांनी साताऱ्यातील काही भागात खेकड्याच्या दोन नवीन प्रजाती शोधून काढल्या होत्या.