मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘मेरा हात पकड कर’ ओळींना उद्धव ठाकरेंचे ‘ऐसी कौन सी बात थी’ने उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 06:11 IST2026-03-25T06:09:01+5:302026-03-25T06:11:00+5:30
हास्यकल्लोळात विधान परिषदेत निरोप समारंभ

मुख्यमंत्री फडणवीसांच्या ‘मेरा हात पकड कर’ ओळींना उद्धव ठाकरेंचे ‘ऐसी कौन सी बात थी’ने उत्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रात पुलं यांच्यानंतर ‘कोट्यधीश’ ही उपाधी बोलण्यात मिश्कीलपणा असणारे उद्धव ठाकरेंनाच मी देईन. सभागृहात त्यांच्या ‘कोट्या’ पुन्हा ऐकायला मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. कधीकाळी एकत्र असणारे आम्ही २०१९ला वेगळे झालो. ‘जिनको मेरा हात पकड कर चलना था, वो बात पकड कर बैठ गये..’ अशी कोटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
प्रत्युत्तरात ठाकरे यांनी, एवढे जवळून ओळखता म्हटल्यानंतर ‘ऐसी कौन सी बात थी की और किसी का हात पकडना पडा..’ अशी कोपरखळी लगावली. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचा उल्लेख ‘साहेब’ असा करत निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. विधान परिषदेतील या वातावरणामुळे निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ हास्यकल्लोळात रंगून गेला.
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिंदेसेनेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आ. अमोल मिटकरी, आ. शशिकांत शिंदे, आ. राजेश राठोड, आ. संदीप जोशी, आ. दादाराव केचे, आ. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, आ. संजय केनेकर यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ १३ मे रोजी समाप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सभागृहात ९ सदस्यांना निरोप देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. यावेळी सर्व सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उद्धव ठाकरे आणि माझ्यात मैत्रीची भावना आज नाही, असे म्हणणार नाही. पण, त्यांच्या आणि आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. राजकारणात मतभेद असतात. वेगवेगळ्या भूमिका असतात. कधी सोबत असतो कधी संघर्ष करतो. पण, या पलीकडेदेखील राजकारणामध्ये सहप्रवासाचे नाते असते. आम्ही ठाकरेंसोबत अनेक वर्षांचे सहप्रवासी असून, समाज व राज्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी एकत्रित करण्याची संधी प्राप्त झाली, असे नमूद करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे यांच्या छायाचित्रण छंदाचे कौतुक केले.
तो क्षण अविस्मरणीय
“विधीमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलो. ती जबाबदारी स्वीकारली. भरलेल्या मंत्रालयात गृहप्रवेशासारखा प्रवेश झाला. तो क्षण विसरू शकत नाही. काही काळाने ‘वर्षा’ सोडून बाहेर पडलो तेव्हा हेलावलेला महाराष्ट्र पाहून गहिवरून आले. असे प्रेम फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये येते,” अशा भावना व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.
इच्छा नसली तरी थांबावेच लागते
सत्ताधारी, विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतात. पण, आज हळव्या वळणावर उभे आहोत. टाळायचे म्हटले तरी निरोपाचे वळण टाळता येत नाही. ज्याचा थांबा आला त्याची व निरोप देणाऱ्यांची इच्छा नसली तरी थांबावेच लागते, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांना राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.