दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:48 IST2025-10-01T16:45:09+5:302025-10-01T16:48:22+5:30
दसऱ्या मेळाव्याच्या खर्चावरुन टीका केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला

दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
Uddhav Thackeray: मराठवाड्याच्या अनेक भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली. तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या पुराने शेतजमिनी वाहून गेल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. त्यामुळे सरकारकने कागदोपत्री अडथळे दूर करून सरसकट मदत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आणि मदत जाहीर केली. दुसरीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी अशी मागणी केलीय. यावरुनच भाजपने शिवसेनेने दसरा मेळावा रद्द करुन त्याचे पैसे शेतकऱ्यांना द्यावे असं आवाहन उद्धव ठाकरेंना केलं. भाजपच्या या मागणीवर उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत टीका केली.
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पीएम केअर्सच्या खात्यावरील निधीचा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वापर करावा अशी मागणी राज्य आणि केंद्र सरकाकडे केली होती. त्यावर भाजपने उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी होणारा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत करावी असं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या मागणीवर भाष्य केलं.
"मला एवढंच म्हणायचं आहे की भाजपने जी काही जाहिरातबाजी चालवली होती ना त्यात जेवढा पैसा खर्च केला तितकाच पैसा त्यांनी पूरग्रस्तांना द्यावा," असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील जाहिरातीवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. त्याचाच उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपला प्रत्युत्तर दिलं.
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटी रुपये खर्च होतात असा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यावरही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. "दसरा मेळाव्याचे बिल मी त्यांच्याकडे पाठवतो. त्याचे मला पैसे आणून द्या," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्स पोस्टवरुन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. "नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या 36 च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती," असं केशव उपाध्ये म्हणाले.