एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 21:39 IST2025-10-17T20:45:50+5:302025-10-17T21:39:24+5:30
Uddhav Thackeray Speech Raj Thackeray MNS Deepostav: राज ठाकरेंच्या मनसे दीपोत्सवाला उद्धव ठाकरेंचे संपूर्ण कुटुंब हजर होते.

एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
Uddhav Thackeray Speech Raj Thackeray MNS Deepostav: महाराष्ट्राच्या राजकारण अशक्य वाटणाऱ्या गोष्टी गेल्या काही वर्षात घडू लागल्या आहेत. सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी भाजपाची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. नंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोबत घेऊन भाजपाशी युती केली आणि ठाकरेंना पक्षाबाहेर केले. पुढे शरद पवारांच्या बाबतीत अजित पवारांनीही तेच केले. या सर्व घडामोडींनंतर गेल्या ४-५ महिन्यांत मुंबई ठाकरे बंधूंचे मनोमिलनही पाहायला मिळाले. आज मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अवघ्या ५५ मिनिटांच्या भाषणातून सर्वांना शुभेच्छा आणि संदेश दिला.
उद्धव ठाकरे काय म्हणाले... वाचा जसंच्या तसं...
उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आजची दिवाळी ही वेगळी आहे, विशेष आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सगळेजण आनंदात रहा, प्रकाशात राहा आणि सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र!
मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव यांची हजेरी, नेमका संदेश काय?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिवाजी पार्क येथील वार्षिक दीपोत्सवात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले. या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती आणि त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे राजकीय युतीच्या चर्चांना उधाण आले आहे. या कार्यक्रमात दोन्ही कुटुंबेही सहभागी झाली होती. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले आणि शर्मिला ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे स्वागत केले. अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू आणि त्यांची कुटुंबे अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसली. या घटनेला विशेष महत्त्व असून यातून मुंबई महापालिकेसाठी ही मोर्चेबांधणी असल्याचे सांगितले जात आहे.