“वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका, नववर्षात विजयाची गुढी उभारा, कामाला लागा”: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 20:19 IST2025-03-31T20:16:12+5:302025-03-31T20:19:55+5:30

Uddhav Thackeray News: वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केले.

uddhav thackeray said bandra east is our area and for victory in mumbai mahapalika election get to work | “वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका, नववर्षात विजयाची गुढी उभारा, कामाला लागा”: उद्धव ठाकरे

“वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका, नववर्षात विजयाची गुढी उभारा, कामाला लागा”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील नेते, पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत असून, शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताना दिसत आहेत. आगामी मुंबई, ठाणे, पुणे यासह राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसून, हा ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. यातच आता उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यभरात यासाठी दौरे करण्यात येणार असून राज्यभरातील नेत्यांनाही त्या-त्या ठिकाणच्या पालिकांबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.  परंतु, पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार असल्याचे सांगितले जात आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार वरुण सरदेसाई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेल्या उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांची आठवण उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना करून दिली. यावेळी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह अन्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका, नववर्षात गुढी उभारा, कामाला लागा

आपल्याला हक्काचा आणि जनतेने निवडून दिलेला आमदार मिळाला आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. वांद्रे पूर्व हा आपलाच इलाका आहे. इथे कामेही दणक्यात करा, असे उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांना उद्देशून सांगितले. तसेच जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. तेच खरे बळ आहे. नवीन वर्ष सुरू झाले आहे, गुढी कुठे उभारायची हे आपल्याला माहिती आहे. आता त्या दिशेने कामाला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील विजय आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ एप्रिल रोजी नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये एकदिवसीय शिबिरासाठी जाणार आहेत. ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत आणि तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन करणारे तज्ज्ञ या शिबिरात शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकदिवसीय संवाद शिबिरातून मार्गदर्शन करणार आहेत.

 

Web Title: uddhav thackeray said bandra east is our area and for victory in mumbai mahapalika election get to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.