Join us  

“PM मोदी-अमित शाह अजूनपर्यंत तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 9:23 PM

Uddhav Thackeray News: मोदीजी आतापर्यंत सगळ्या मंदिरात गेले. पण, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेल्याचे अजून दिसलेले नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray News: लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे काही तास राहिले आहेत. यातच पुढील टप्प्यासाठीच्या प्रचाराला आणखी वेग आला आहे. पंतप्रधान मोदी, अमित शाह महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. अमित शाह यांनी प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीकेचे बाण सोडले. 

उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले. पण, हे नकली शिवसेनेचे अध्यक्ष सोनिया गांधींच्या भीतीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेले नाहीत. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही दिले होते, पण त्यांनी तब्येतीचे कारण सांगत आले नाहीत. पण आता शरद पवार निवडणुकीच्या प्रचारात फिरत आहेत, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. यावर आता उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. ठाकरे गटाने वचननामा जाहीर केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी-अमित शाह अजूनपर्यंत तुळजाभवानी मंदिरात का गेले नाहीत

सन २०१४ आणि २०१९ ला आम्ही पाठिंबा दिल्यावर मोदी सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचे काम करेल, असे वाटले होते. पण, आमची फसगत झाली आहे. मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषेबद्दल आणि तुळजाभवानी मातेबद्दल आकस आहे, हे दिसत आहे. कारण मोदीजी आतापर्यंत सगळ्या मंदिरात गेले. पण, तुळजाभवानी मातेच्या मंदिरात गेल्याचे अजून दिसलेले नाही. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवेळेस मी काळाराम मंदिरात जाणार म्हटल्यावर, ते झाडू घेऊन पोहोचले, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, भाजपाला आता पराभव डोळ्यांसमोर दिसत असल्याने ते आता रामराम म्हणायला लागले आहेत. त्यांचा हा नेहमीचाच उद्योग आहे. महाराष्ट्राचे वैभव मविआ काळात वाढत होते. त्यावेळी केंद्र सरकार मविआ सरकारला मदत करत नव्हते. आता इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर अधिक जोमाने आम्ही महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करुन देऊ, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले.  

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४नरेंद्र मोदीअमित शाह