“...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:56 IST2025-04-03T14:55:56+5:302025-04-03T14:56:00+5:30
Uddhav Thackeray PC News: मी अंधभक्त नाही. एनडीएमध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोध केला असता, असे सांगत कोरोनाच्या काळात मोदीही घरूनच काम करत होते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केला.

“...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे”; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
Uddhav Thackeray PC News: बुधवारचा दिवस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून चांगलाच गाजला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी केवळ यावर राजकीय मते व्यक्त केली नाही, तर सुधारणा विधेयकावर लोकसभेत विस्तृत चर्चा झाली. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आपापले म्हणणे मांडले. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत दीर्घ चर्चेनंतर मध्यरात्री मतदानाने पारित करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ एवढी मते पडली. यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना भाजपाला थेट इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सविस्तर भाष्य केले. वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लीम ते कसे सहन करतील. वक्फ बोर्डात काही अफरातफर सुरू असेल तर नक्कीच त्यावर पायबंद घातला पाहिजे. देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटी बाजूला ठेवून हिंदू-मुस्लीम केले जात आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे काही बाटगे म्हणतात मग तुमच्या आजूबाजूला मुस्लिमांचे कौतुक होत होते तेव्हा तुम्ही का गप्प बसला? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.
...तर उद्या कुठेही निवडणूक झाली, तर भाजपाला भारी पडणार आहे
आमची भूमिका स्वच्छ आहे. या विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. अमित शाह, किरन रिजिजू यांनी मुसलमानांचे लांगूलचालन केलं आहे. त्यामुळे हिंदूंचे डोळे उघडले आहेत. हे आपला वापर करत असल्याचे दिसून आले आहे. हिंदू जागा झाला आहे. त्यामुळे उद्या कुठेही निवडणूक झाली तर भाजपला भारी पडणार आहे. भाजपाला धन्यवाद देईन की, त्यांनी वक्फ बोर्डाचा विषय घेतला. त्यामुळे भाजपाचे खरे रूप समोर आले आहे. जेडीयू आणि टीडीपीने सांगितले की, आम्ही मुस्लिमांच्या हिताच्या विरोधात कुणालाही जाऊ देणार नाही. त्यावर अमित शाह यांच्यापासून अन्य कोणाचीही बोलयाची हिंमत झाली नाही, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, काँग्रसेचा दबाव नाही. मी अंधभक्त नाही. एनडीएमध्ये असतो तरी आम्ही वक्फला विरोध केला असता. कारण आम्ही अशा भूमिका घेत आलो आहोत, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाहीत, अशी टीका भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून वारंवार केली जाते. या पत्रकार परिषेदत उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला. तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.