Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 20:03 IST2025-10-02T20:02:16+5:302025-10-02T20:03:45+5:30
Uddhav Thackeray Dasara Melava 2025: जोपर्यंत मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि जनसुरक्षा कायद्यावर टीकेचे आसूड ओढले.

Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Speech: आज आपला दसरा मेळावा होत आहे. अजून दोन-तीन दसरा मेळावे झाले. बाकीच्यांबद्दल मला काही बोलायचे नाही. पण विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो दसरा मेळावा झाला, त्याबाबत मी जरूर बोलणार आहे. कारण १०० वर्षे ही काही थोडी थोडकी वर्षे नाहीत. आज काय योगायोग आहे, काही कल्पना नाही. पण संघाची १०० वर्षे पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना ठाकरे म्हणाले की, लढणारी माणसे आता कमी होत चालली आहेत. जो लढेल, तो तुरुंगात जाईल, अशी सरकारची नीती झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी पाहिले असेल की, जनसुरक्षा कायदा आणला गेला. त्याला आपणही विरोध केला आणि तो लागू होता कामा नये. मुख्यमंत्री आणि त्यांच्या चेल्या-चपाट्यांनी त्याची मखराशी केली. आम्ही कडवे डावे वगैरे ओळखत नाही. आम्ही देशभक्त आणि देशद्रोही या दोनच गोष्टी ओळखतो. तोंडदेखले आम्हाला कारण देणार असाल, तर उदारहणासकट मी दाखवून देतो कसा गैरवापर होतो, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक यांचा दाखला दिला.
सोनम वांगचूक यांनी न्याय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले
सोनम वांगचूक चांगला देशभक्त माणूस आहे. या माणसाने लेह-लडाख यासारख्या अतिशय दुर्गम भागात अतिशय कडाक्याच्या थंडीपासून आपल्या सैनिकांचा बचाव व्हावा म्हणून सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा उभी करून छावण्या बांधून दिल्या. पाण्याचे दुर्भिक्ष होते. पाण्याची टंचाई होऊ नये, पाणी उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी आइस स्तुपची योजना आणली. अगदी काल परवापर्यंत ते मोदींची स्तुती करत होते. पण सोनम वांगचूक यांनी न्याय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. लेह-लडाखला न्याय हक्क मिळायलाच हवा. न्याय हक्क ही लोकशाहीतील मूलभूत गरज आहे. उपोषण सुरू ठेवले होते. पण सरकार ढूंकून पाहायला तयार नाही. मग पेटले सगळे GenZ. जसे नेपाळमध्ये पेटले, तसेच लेह-लडाखमध्ये रस्त्यावर आले. मोदीबाबांनी त्यांनी सरळ उचलून तुरुंगात टाकले. हा जनसुरक्षा कायदा, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
दरम्यान, जनसुरक्षा कायदा हा ‘हम करे सो कायदा’ असा आहे. तो तोडून-मोडून टाकला पाहिजे. जोपर्यंत मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचूक हे देशद्रोही नव्हते. पण त्यांच्यावर आता आरोप ठेवलेत की तुम्ही पाकिस्तानात जाऊन आलात. एका शिष्टमंडळासोबत ते पाकिस्तानला गेले होते, म्हणून ते देशद्रोही ठरत असतील आणि अटक होणार असेल, तर नवाझ शरिफचा केक गपचूप जाऊन खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणायचे, या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.