मुंबई
मराठीच्या मुद्द्यावरुन दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या युतीच्या नांदीची चर्चा सुरू झाली. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सावध पवित्र्याच्या भूमिकेमुळे अद्याप युतीचं पानं काही हलताना दिसत नाही. यातच उद्धव ठाकरे मात्र युतीसाठी प्रचंड सकारात्मक असल्याचं वारंवार दिसून येत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. याचा टीझर नुकताच संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंट पोस्ट केला आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आपल्यासोबत आले असल्याचं म्हटलं आहे.
'सामना'तून येत्या १९ आणि २० जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीचा टिझर आज राऊत यांनी ट्विट केला. ज्यात उद्धव ठाकरे विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक भूमिका व्यक्त करताना दिसतात. याच टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंच्या आतापर्यंतच्या परंपरेवर बोलताना प्रबोधनकारांपासून बाळासाहेब ते अगदी स्वत: आणि आदित्य ठाकरेंचा दाखला दिला. यासोबतच त्यांनी राज ठाकरेंचंही यावेळी नाव घेतलं.
"ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही. तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो आहोत. माझ्या आजोबांपासून त्याच्यानंतर शिवसेनाप्रमुख, मग मी आहे, आदित्य आहे. आता सोबत राज आलेला आहे", असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. या मुलाखतीचा पहिला भाग १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
युतीबाबत कोणतंही भाष्य नकोउद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक विधानं होत आहेत. पण दुसरीकडे राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतंही भाष्य न करण्याच्या सूचनाच सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. नुकतंच मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं नाशिकमध्ये शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. ज्यात राज ठाकरे मराठी मेळावा हा कोणत्याही युतीच्या पार्श्वभूमीवर नव्हता. तो फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाही. युती संदर्भात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बघू, असं म्हटलं आहे.