Join us

एकनाथ शिंदेंचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:12 IST

तुम्ही घाबरुन गेलात, इतरांनाही घाबरवले. जितके आमदार, खासदार गेले त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना कारवाईची भीती होती असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला.

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अटकेला घाबरले होते, भाजपासोबत चला, नाहीतर मला अटक होईल असं सांगत ते मातोश्रीत येऊन रडले होते असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊतांनीही हा दावा खरा असून शिंदे माझ्याही घरी आले होते असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, मला तुरुंगात जायचं नाही, अटकेची भीती वाटतेय असं मातोश्रीत येऊन सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले ते सत्य आहे. अशी चर्चा माझ्याशी त्यांनी माझ्या भांडुपमधील घरी येऊनही केली होती. तेव्हा आपण त्याला सामोरे जावं असं म्हटलं होते. पण शरीर वाघाचं अन् काळीज उंदराचं हे शिवसैनिकाचे महत्त्व असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाढीत शौर्य होते ते तुम्ही दाखवायला हवं होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुम्ही घाबरुन गेलात, इतरांनाही घाबरवले. जितके आमदार, खासदार गेले त्यातील निम्म्याहून अधिक लोकांना कारवाईची भीती होती. ईडी, सीबीआयच्या कारवाईला घाबरुनच ते गेले. पक्षाने तुम्हाला सर्वकाही दिले मग पक्षासोबत तुम्ही उभं राहायला हवं होते. देशात दबाव तंत्राचे राजकारण होत आहे. जर काही चुकीचे केले नाही घाबरण्याची गरजच काय? अन्यायाविरोधात उभे राहायला हवं होते. परंतु त्यांना अटकेची भीती होती. घाबरणाऱ्यांचे नेतृत्व आजच्या मुख्यमंत्र्यांनी केले असा टोलाही संजय राऊतांनी लगावला. 

दरम्यान, आज राष्ट्रवादीसोबतही तेच सुरू आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाईची भीती दाखवली जातेय. संकटाच्या काळात जो पाय रोवून उभा राहील, कायदा-संविधानाच्या रक्षणासाठी तोच समाजाचा हिरो बनेल. घाबरू नका हा मंत्र महत्त्वाचा आहे. मी भगवा पताका हातात घेऊन ईडीच्या वाहनात बसलो होतो. घाबरण्याचं कारण नव्हते. कारण माझ्यावरील सर्व आरोप खोटे होते. मला बनावट गुन्ह्यात अडकवण्यात आले. जर मी काहीच केले नसताना मला तुरुंगात पाठवले, मी गेलो. ज्यांच्यावर असे प्रसंग येतात त्यांनी बेडरपणे त्याला सामोरे गेले पाहिजे. आपण मावळे, शिवसैनिक आहोत ते दाखवून द्यायला हवं होते असंही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतएकनाथ शिंदेआदित्य ठाकरे