Uddhav Thackeray met angry Gopinath Munde twice, but ... issue of pankaja munde | नाराज गोपीनाथ मुंडेंची उद्धव ठाकरेंनी दोनदा भेट घेतली होती, अन्... 
नाराज गोपीनाथ मुंडेंची उद्धव ठाकरेंनी दोनदा भेट घेतली होती, अन्... 

मुंबई - भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंचे वडिल गोपीनाथ मुंडे हेही भाजपावर नाराज होते. सन 2011 साली पक्षाच्या भूमिकेवरुन ते नाराज होते. त्यावेळी नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नितीन गडकरी हे गोपीनाथ मुंडेंपेक्षा ज्युनियर असूनही ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. तेव्हापासून गोपीनाथ नाराज होते. त्यामुळे गोपनाथ मुंडें काँग्रेस किंवा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी दोनवेळी गोपीनाथ मुंडेंची भेट घेतली होती. मात्र, गोपीनाथ मुंडेंनी भाजपातच राहणे पसंत केले. त्यानंतर, केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर गोपीनाथ मुंडेंना कृषीमंत्रीपद मिळाले होते.

गोपीनाथ कन्या पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत पुढे काय करायचं? कोणता मार्ग निवडायचा? असा मजकूर लिहल्याने पंकजा मुंडेही भाजपात नाराज असून त्या पक्षाला रामराम करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मात्र, पंकजा यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, आपण भाजपातच राहणार असल्याचे सांगितले. मी भाजपा सोडणार नसून बंडखोरी माझ्या रक्तात नसल्याचा खुलासा भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी भाजपाची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. मी पक्षासाठी काम केलेलं आहे. भाजपा सोडत असल्याच्या अफवांमुळे व्यथित आहे. मी यासंदर्भात 12 डिसेंबर रोजी बोलणार आहे. तेव्हा मी काय ते स्पष्ट करेन, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे. मी कधीही कुठल्या पदासाठी लाचारी स्वीकारली नाही, कधीही कुठलं पद स्वीकारण्यासाठी दबावतंत्र वापरलं नाही. हे माझ्या रक्तात नाही. मला आत्मचिंतनाची आणि आपल्या लोकांशी काय बोलायचं आहे, यासाठी वेळ नक्कीच दिला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या मनात खदखद होती, ती खदखद त्यांनी उघडपणे बोलून दाखवली नाही. पण, वर्तमानपत्रातील नाराजीच्या बातम्यांनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. या काळात शिवसेनेचे तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी माझी दोनवेळा भेट घेतली. पण, त्यांनी मला शिवसेनेत येण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नाही. गेल्या 22 वर्षांची आमची युती आहे, मी 2009 साली नाराज झालो होतो, तेव्हाही माझी नाराजी दूर करून तुम्ही भाजपातच राहिलं पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी मला सांगितल्याचं गोपीनाथ मुंडेंनी स्पष्ट केलं होतं. भाजपा-शिवसेना आणि रिपाइं ही युती घडविण्यात तुमची महत्वाची भूमिका राहिली आहे. पण, माझ्याच पक्षातील काही लोकं मी शिवसेनेत-काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवत होते, असेही मुंडेंनी त्यावेळी सांगितले होते. तर, गोपीनाथ मुंडे हे तत्कालीन काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांचे जवळचे मित्र असल्याने ते काँग्रेसमध्येही जाणार अशा चर्चा होत्या.  

दरम्यान, भाजपाचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनीही भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाने कायम ओबीसी नेत्यांना संपविण्याचा डाव आखला. गोपीनाथ मुंडे यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव भाजपाने केला होता. पण, आम्ही त्याला विरोध केल्याने तो ठराव फेटाळून लावला असं त्यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपातंर्गत नेतृत्वाविषयी नाराजी समोर येऊ लागली आहे. सुरुवातीला एकनाथ खडसेंनी पक्षातील नेत्यांनी जाणूनबुजून काही नेत्यांना बाजूला ठेवले. विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे, मी स्वत: आम्हाला सोबत घेऊन निवडणुका लढविल्या असत्या तर किमान 25 जागा भाजपाच्या जास्त निवडून आल्या असत्या, असा दावा करत खडसेंनी राज्यातील नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली. 
 

Web Title: Uddhav Thackeray met angry Gopinath Munde twice, but ... issue of pankaja munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.