उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:11 IST2025-11-25T16:10:17+5:302025-11-25T16:11:37+5:30
Uddhav Thackeray Meet Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.

उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...”
Uddhav Thackeray Meet Sanjay Raut: उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना प्रकृतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बाहेर जाण्यास व गर्दीत मिसळण्यापासून काही दिवस दूर राहण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे, अशी माहिती स्वतः राऊत यांनी सोशल मीडियावरून दिली. यानंतर अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली.
संजय राऊत यांच्या प्रकृतीत काही गंभीर समस्या असल्याचे समोर आले. त्यावर उपचार सुरू असून, यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर जाणे, गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नाइलाज असला तरी ठणठणीत बरा होऊन नवीन वर्षात भेटीस येईन, असे संजय राऊत यांनी सोशल मीडियावर म्हटले होते. आजाराशी झुंजत असलेले संजय राऊत आज बऱ्याच दिवसांनंतर सार्वजनिक ठिकाणी दिसले. दादर शिवाजी पार्क येथे असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी उपस्थित राहत संजय राऊत यांनी बाळासाहेबांना नमन केले. यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी निवासस्थानी जाऊन संजय राऊतांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, हल्ली रोज संजय राऊत यांना फोन करत नाही. आता रोज सुनील राऊतला संजयच्या प्रकृतीबद्दल विचारण्यासाठी छळत असतो. खूप दिवसांपासून त्यांना भेटायचे होते. आता भेट झाली, चांगले वाटले. संजय खूप फ्रेश दिसले. संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात दिसतील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी संजय राऊत यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. थकलेले शरीर आणि तोंडावर मास्क लावलेले संजय राऊत भाऊ सुनील राऊत यांचा हात हातात घेत शिवाजी पार्कवर दाखल झाले. तिथे त्यांनी उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. त्यानंतर संजय राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नतमस्तक झाले. आजारपणाचा सामना करत असतानाही संजय राऊत हे लढाऊ बाणा दाखवत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी आल्याने उपस्थित शिवसैनिकही भारावून गेलेले दिसले.