उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 14:55 IST2025-04-13T14:54:58+5:302025-04-13T14:55:35+5:30

ज्यापद्धतीने कामाला संथगती आणि चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती असा आरोप संजना घाडी यांनी ठाकरे गटावर केला.

Uddhav Thackeray group spokesperson, deputy leaders Sanjana Ghadi, Sanjay Ghadi join Eknath Shinde's Shiv Sena | उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल

उद्धव ठाकरेंनी दिली होती जबाबदारी; ४ दिवसातच प्रवक्त्या व उपनेत्या शिंदेसेनेत दाखल

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अवघ्या २० जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन उद्धवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करत आहेत. त्यातच उत्तर मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धवसेनेच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. घाडी यांच्या पक्ष प्रवेशामुळे उत्तर मुंबईतील दहिसर, मागाठाणे मतदारसंघात ठाकरे गटाला सुरूंग लावण्याचं काम शिंदेसेनेने केले आहे.

शिवसेनेत २ गट पडले तेव्हापासून संजना घाडी ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्या प्रवक्त्या म्हणून समोर आल्या. त्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविकाही आहेत. त्या उद्धवसेनेच्या उपनेतेपदी असून अलीकडेच ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या प्रवक्ता यादी संजना घाडी यांचे नाव नव्हते. त्यामुळे संजना घाडी नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेर शेवटच्या क्षणी संजना घाडी यांचे नाव प्रवक्तेपदी जाहीर करण्यात आले. परंतु तरीही संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

यावेळी संजना घाडी म्हणाल्या की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या विचारांनी एकनाथ शिंदे काम करतायेत. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची याचा कौल मिळेल असं आम्हाला वाटत होते. त्यात जनतेने हा कौल दिला. आम्ही सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. ज्यापद्धतीने कामाला संथगती आणि चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गळचेपी होत होती. आम्ही ज्यांच्यासाठी काम करत होतो, तिथे आमचीच गळचेपी होणार असेल. तेव्हा लोक त्यांना नकोय का असा प्रश्न आमच्या मनात तयार झाला. तेव्हा चांगल्या विकासकामाच्या जोरावर राज्याला पुढे घेऊन जाणारे जमिनीवरचे कार्यकर्ते असलेले एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनासाठी काम करायला मिळतोय याचा आनंद आहे. आमच्यावर द्याल ती जबाबदारी आम्ही पार पडू. आपला विश्वास कायम राहावा असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

दरम्यान, प्रत्येकवेळा आरोप, शिव्या शापाशिवाय दिवस जात नाही. आरोपाला आरोपाने मी उत्तर दिले नाही तर कामातून दिले. अडीच वर्षात जे काम महाराष्ट्राने पाहिले, त्यामुळे जनतेने आम्हाला कौल दिला. सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केल्याने दैदीप्यमान यश आपल्याला मिळाले. आजही राज्यात अनेक निर्णय आपण घेतोय. पद येतात, जातात परंतु नाव जाता कामा नये. हे नाव टिकवण्याचं काम आपण केले आहे. आपल्याला जे काही करायचे ते सर्वसामान्य लोकांसाठी करायचंय. शिवसेनेचे नगरसेवक आपल्याकडे येण्याचा ओघ प्रचंड मोठा आहे. महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

Web Title: Uddhav Thackeray group spokesperson, deputy leaders Sanjana Ghadi, Sanjay Ghadi join Eknath Shinde's Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.