उद्धव ठाकरे अपयशी, हिंदुत्व असेल तर दिसत कसं नाही? मनसेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 03:24 PM2020-11-27T15:24:19+5:302020-11-27T15:27:00+5:30

Sandeep Deshpande News : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीवर मनसेने जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray government fails, how can it be seen if there is Hindutva? MNS question | उद्धव ठाकरे अपयशी, हिंदुत्व असेल तर दिसत कसं नाही? मनसेचा सवाल

उद्धव ठाकरे अपयशी, हिंदुत्व असेल तर दिसत कसं नाही? मनसेचा सवाल

googlenewsNext

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये आज प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीमधून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर जोरदार टोला लगावण्यात आला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीवर मनसेने जोरदार टीका केली आहे. ही मुलाखत म्हणजे माझा सामना, माझी मुलाखत, असा प्रकार होता, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीबाबत प्रतिक्रिया देताना संदीप देशपांडे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची सामनामधील मुलाखत ही माझा सामना, माझी मुलाखत या प्रकारातील होती. ते सपशेल अपयशी ठरले आहेत. ते फेसबूक लाईव्हमध्येही सामान्यांच्या हिताचे काही बोलले नव्हते. जर उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये हिंदुत्वाचे रक्त असेल तर ते दिसत का नाही. वीजबिल, बेरोजगारीसारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ते का बोलत नाहीत. या मुलाखतीमधून केवळ भाजपाला धमकवण्याचे काम झाले आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.


दरम्यान, सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबियांवर हल्ले सुरु झाले आहेत ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. हिंदुत्त्ववादी म्हटल्यावर एक संस्कृती आहे, आणि तुम्ही कुटुंबावर येणार असाल, मुलाबाळांवर येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत. तुम्ही धुतले तांदुळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर शाब्दीक हल्ले करणाऱ्या आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाला उत्तर दिलं आहे. 

दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यावरुनच उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहेत.  तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे, पूर्ण तयार आहे. पण सुडाने जायचं का?. मग जनतेनं आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची सुडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना भरला आहे. 

Web Title: Uddhav Thackeray government fails, how can it be seen if there is Hindutva? MNS question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.