BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 08:33 IST2025-12-15T08:28:51+5:302025-12-15T08:33:10+5:30
जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे.

BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
मुंबई - पुढील काही दिवसांत मुंबईसह इतर महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यात मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपा महायुतीसमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे. मात्र त्यातही ठाकरेंकडील नेते महायुतीत सामील होत असल्याचे चित्र आहे. आज मुंबईत एका बड्या महिला नेत्याचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. या महिला नेत्या ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सून माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर या आहेत. तेजस्वी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याचं पुढे आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा मोठा धक्का असल्याचं मानले जाते.
जानेवारी महिन्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांची इतक्या वर्षांची सत्ता उलथावून लावायची यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. त्यात मुंबईत सत्ता टिकवून ठेवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न आहेत. ही निवडणूक ठाकरे बंधू यांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं बोलले जाते. त्यात मागील काही दिवसांपासून ठाकरेंनी बैठकीचा सपाटा लावला आहे. सर्वच मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजपा पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला नुकसान होण्याची शक्यता आहे.
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेतील विविध वार्डात बैठका आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. मुंबईत महायुतीचा महापौर बसेल असा विश्वास भाजपा नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यात शिंदेसेनेसोबत जुळवून घेत भाजपाने मुंबईत महायुतीचा मोट बांधली आहे. कुठल्याही परिस्थितीत मुंबईत महापौर बसवायचा असा चंग भाजपा नेत्यांचा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला भगदाड पाडण्यासाठी आज मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. त्याशिवाय उद्धवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. एक वर्षापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांच्या पतीचं गोळीबारात निधन झाले होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर या निवडणूक लढणार नाहीत. वार्ड क्रमांक १ हा ओबीसी राखीव झाल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु पालिकेच्या वार्ड क्रमांक ७,८ किंवा २ मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतील असं बोलले जात होते. मागील अनेक दिवसांपासून त्या भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. अखेर हा पक्षप्रवेश आज होत असल्याचं समोर आले आहे.