युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 20:22 IST2025-07-09T20:19:32+5:302025-07-09T20:22:51+5:30
Uddhav Thackeray News: राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतर याबाबत आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.

युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Uddhav Thackeray News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सकारात्मक असले, तरी अजून दोन्ही प्रमुखांनी तशी घोषणा केलेली नाही. परंतु, राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार, ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का, यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत. यातच आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्पष्ट आदेश दिले. याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसेच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचे नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचे नाही, असे राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेते, पदाधिकारी, प्रवक्ते, कार्यकर्ते यांना बजावले. यावर उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. ते पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर, चांगले आहे ना. त्याच्यात काय, ते बोलतील ना त्यावर, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आणि शिवसेना पाठीशी उभी असल्याचे सांगितले.
दरम्यान, मी तुमचे कौतुक करण्यासाठी आलो आहे. तुम्ही एकजुटीने इथे जमला आहात. शिवसेना पूर्ण ताकदीने तुम्ही हा लढा जिंकेपर्यंत तुमच्या पाठिशी आहे, हे वचन द्यायला आलो आहे. विजयी मेळाव्याला मी पुन्हा येईन. पुन्हा येईन आता खरेतर फार बदनाम झाले आहे. पण मी नक्की येईन विजय उत्सव आपण एकत्र साजरा करू. तुमच्या हक्काच्या गोष्टी दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सत्ताधारी फक्त दिल्लीश्वर जे सांगतात ते ऐकतात. तोच त्यांचा गुरु आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय चालला आहे. महाराष्ट्रात भूमिपूत्र, मराठी माणूस यांना चिरडून टाकण्याचा विडा दिल्लीच्या गुलामांनी घेतला आहे. आपण आपली एकजूट करून यांना असा धडा शिकवू की, हे वळवळ करायला शिल्लक राहणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.