Uddhav Thackeray Dasara Melava: 'देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले, दीड दिवस आले अन् विसर्जन झालं', उद्धव ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 20:26 IST2022-10-05T20:24:04+5:302022-10-05T20:26:17+5:30
Uddhav Thackeray Dasara Melava:'जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका.'

Uddhav Thackeray Dasara Melava: 'देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणाले, दीड दिवस आले अन् विसर्जन झालं', उद्धव ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Melava: आज दसरा मेळाव्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही शेलक्या शब्दात टोला लगावला. तसेच, भाजप आणि शिवसेनेत ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याचाही पुनरुच्चार केला.
'अडीच-अडीच वर्षे ठरली होती, पण...'
शिवरायांच्या साक्षीने, आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायची, हे ठरले होते. अडीच वर्षं तुमची आणि अडीच वर्षं शिवसेनेची, हेच तेव्हा सांगत होतो. आत्ता त्यांनी तेच केले. ते तेव्हा का नाही केलं? तेव्हा झाले असते, तर सन्माने झाले असते. आता कशाप्रकारे सत्ता स्थापन केली, हे सगळ्यांनाच माहित आहे. माझी शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी बोटही हालत नव्हती. तेव्हा मी ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती, तेव्हा हा 'कट्टपा'(एकनाथ शिंदे) कट करत होता. पण, त्यांना कल्पना नाही, हा उद्धव ठाकरे नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे,' असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
'फडणवीस आले अन् दीड दिवसात विसर्जन झाले'
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना म्हणाले, 'मी कधीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारला नाही. फडणवीसांना कायदा चांगला कळतो. ते अतिशय सभ्य गृहस्थ आहेत, हा टोमणा मारलेला नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जाताना बोलून गेले होते, मी पुन्हा येईन. दीड दिवस आले आणि नंतर विसर्जन झालं. मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून आले. कायद्याच्या चौकटीत राहून बोला, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. कायदा फक्त तुम्हालाच कळतो असं नाही. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची हे नाही चालणार,' असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.
'शांत राहू द्या, अन्यथा...'
ते पुढे म्हणाले, 'जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत राहू द्या. पिसाळायला लावू नका. माझ्या शिवसैनिकावर अन्याय कराल, तर तुमचा कायदा तुम्ही मांडीवर कुरवाळत बसा. एकतर्फी कायद्याचा वापर आम्ही होऊ देणार नाही. तुमचे भाजप सरकार हिंदुत्व हिंदुत्व करत गायीवर बोलता. महागाईवर बोला, तिकडे देश होरपळतोय. गॅस महागला, भाज्या महागल्या, डाळी महागल्या सांगायला गेलात तर म्हणणार जय श्रीराम,' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.