पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 08:49 PM2019-10-08T20:49:28+5:302019-10-08T20:49:41+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दसऱ्या मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं आहे.

uddhav thackeray DASARA MELAVA COMMENTRY ON CONGRESS AND NCP | पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार- उद्धव ठाकरे

पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार- उद्धव ठाकरे

Next

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज दसऱ्या मेळाव्यात उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घालत काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, एका महिन्यात दोन विजयादशमी एक आजची आणि एक 24 तारखेची आहे. या देशात राम मंदिर पाहिजे, त्या रामाचं मंदिर आम्हाला सत्ता मिळवण्यासाठी नको, तर हिंदू जनतेसाठी हवे आहे. आमचा कारभार प्रभू रामचंद्रांसारखा असेल. जर दिलेली ती वचनं पाळणार नसू तर देऊन त्याचा फायदा काय?, असंही म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराचा राग आळवला आहे.

पुढे ते म्हणाले, युती झाल्यामुळे जरा जपून बोलावं लागतं. शिवरायांचा महाराष्ट्र हा हाजी हाजी करणारा नाही. शिवसैनिक ही माझी तलवार आहे. अन्यायापासून रक्षण करणारी माझी ढाल आहे. वाघ नखांनी गुदगुल्या करता येत नाही, तर कोथळा बाहेर येतो. पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा काढणार, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांवर टीका केली आहे. शिवरायांचा महाराष्ट्र हा कोणाचीही लाचारी करणारा नाही. आमची ताकद काँग्रेसच्या मागे कधीही उभी राहू देणार नाही. वयामुळे नव्हे, तर भ्रष्टाचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी थकली आहे. आम्हाला करायचं ते उघड करू, लपून करणंही शिवसेनेची औलाद नाही. 

नाठाळाच्या माथी हाणू काठी, पण काठी कोणाच्या हातात द्यायची हे तुम्हालाच ठरवायचं आहे. धनगरांच्या काठीला तलवारीची धार लागली पाहिजे. सत्ता तर कोणत्याही परिस्थितीत मला पाहिजे. मुसलमान जरी आमच्यासोबत आले तरी त्यांना न्याय मिळवून देऊ, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.उत्तर प्रदेशमधली सपा-बसपाची युती का टिकली नाही. कारण त्यांच्या युतीत प्रामाणिकपणा नव्हता. आमच्या युतीमध्ये प्रामाणिकपणा आहे, त्यांच्या युतीमध्ये सत्तेची लालसा होती. शिवसेना कोणासमोरही झुकणार नाही. देशद्रोहाचा खटला काढून टाकणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा कसा देणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. 

अजित पवारांच्या मुद्द्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. अजित पवारांच्या डोळ्यांत अश्रू आले, मगरीच्या डोळ्यातही नक्राश्रू येतात. परंतु अजित पवारांच्या रूपाने मी ते अश्रू पाहिले. राजकारण खालावलं आहे म्हणून शेती करणार, असं ते म्हणाले, पण धरणात पाणी नसल्यावर काय करणार?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे. शेतकरी पाणी नाही असं सांगत होता, तेव्हा तुम्ही काय बोललात ते विसरू नका, तुमच्या कर्मानं डोळ्यात पाणी आणलेलं आहे. तसेच सुडाचं राजकारण कोणीही महाराष्ट्रात करायला गेल्यास त्याला मोडून टाकू, शिवरायांचा महाराष्ट्र सुडाचं राजकारण कधीही सहन करणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  

शरद पवारांना उद्देशून ते म्हणाले, 2000साली जे तुम्ही करत होतात, त्यावेळी का महाराष्ट्र धगधगता ठेवला होतात. शिवसेनाप्रमुखांना अटक झाली, लोकांची धावपळ झाली. 1992-93ला बाबरी कुठे पाडली, पण शिवसेनाप्रमुखांना इथे अटक करण्यात आली. बाळासाहेबांवर खटला का दाखल केला?, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि पवारांना विचारला आहे. 

Web Title: uddhav thackeray DASARA MELAVA COMMENTRY ON CONGRESS AND NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.