Join us

“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 16:27 IST

Uddhav Thackeray PC News: एका दिवसासाठी, एका माणसासाठी कोट्यवधी रुपये उधळले गेले, त्याचा पंचनामा कोण करणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray PC News: अतिवृष्टी होत आहे. ढगफुटी होत आहे. पंचनामे करणार आणि त्यानंतर मोजके पैसे वाटून मोकळे होणार. शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. तरीही तुम्ही पंचनामे झाल्यानंतर त्यांना पैसे देणार. या सरकारने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला हवी. पण त्यासोबतच तातडीने सरसकट एक काहीतरी रक्कम द्यायला काय हरकत होती, असा प्रश्न ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्याकडे पैसे आहेत. पण कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करता, हे जे मी म्हणतो ते याबद्दल असते. त्या जाहिरातीची गरज काय होती. त्याऐवजी सरकारने तातडीने मदत करायला हवी होती, अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. 

देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले

देवाभाऊ या नावाने तुम्ही कोट्यवधी रुपयांची जाहिरात करत आहात, त्याचे पैसे कुठून आले, याचा पंचनामा कोण करणार? पैसे दिले कोणी? जाहिरात कशासाठी केली? छत्रपती शिवरायांच्या चरणी फुले वाहताना किंवा हार घालताना जाहिरात करायची. सर्व वृत्तपत्रात जाहिराती होत्या. कोट्यवधी रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी उधळत असाल, तेच पैसे शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून दिली असतील, तर काय बिघडले असते? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. 

दरम्यान, आशिषा चषक स्पर्धेत भारताने वर्चस्व गाजवत पाकवर विजय मिळवला. यानंतर भारतीय संघाने पाकसोबत हस्तांदोलन केले नाही, यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला मी बोगस जनता पार्टी म्हणतो. त्यांचे देशभक्तीचे ढोंग उघडे पडले आहे. आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करतात. पण अमित शाहांचा मुलगा जय शाह याच्या हट्टापायी पाकिस्तानबरोबर सामना खेळावा लागला. यामुळे देशाच्या प्रतिमेचा चुराडा झाला. कणखर भूमिका दाखवायला हवी होती. एक सामना खेळलो नसतो, आशिया कपमध्ये सहभागी झालो नसतो, तर काय झाले असते? असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :उद्धव ठाकरेराज्य सरकारशेतकरीपाऊसशिवसेना