Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झालंय - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 07:48 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

मुंबई - मोदी सरकारनं नोटाबंदी निर्णय लागू केल्यानंतर 15 लाख 41 हजार कोटींच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांपैकी तब्बल 99.30 टक्के नोटा पुन्हा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत, ही माहिती सांगणार अहवाल रिझर्व्ह बँकेनं बुधवारी जाहीर केला. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रिझर्व्ह बँकेवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सामना संपादकीयमध्ये उद्धव यांनी रिझर्व्ह बँकेचा उल्लेख केला 'झिंगलेलं माकड' असा केला आहे.

''रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले आहे. नोटाबंदीच्या निमित्ताने देशप्रेमाचे धडे देण्यासाठी ‘भगतगण’ पुढे पुढे करीत होते. मात्र ‘झिंगलेल्या माकडा’लाही नोटाबंदीचे ‘सत्य’ लपवणे अवघड झाले आणि हे ‘वास्तव’ त्याच्या अहवालातून समोर आले. नोटाबंदी हा फियास्कोच होता हे ‘झिंगलेल्या माकडा’नेच मान्य केले आहे. झिंगलेल्या माकडाची ही गोष्ट आहे. ती लिहिणे इसापलाही जमले नसते'', अशा शब्दांत त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. 

सामना संपादकीयमधील ठळक मुद्दे : -- ‘‘मैंने देश से सिर्फ 50 दिन मांगे है. उसके बाद अगर मेरी कोई गलती निकल जाए, गलत इरादे निकल जाए, कोई कमी रह जाए तो जिस चौराहे पर खडा करेंगे, वहाँ खडा होकर देश जो सजा देगा उसे भुगतने के लिए तैयार हूं।’’ – नोटाबंदीवर पंतप्रधान मोदी

- ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असे आपल्या संतसज्जनांनी म्हटले आहे. सपशेल फसलेल्या नोटाबंदीने देशाला आर्थिक अराजकात ढकलले. त्यामुळे देशाला दिलेल्या वचनास जागून पंतप्रधान मोदी हे आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? 

- नोटाबंदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करणारी ‘कसाई’गिरी होती यावर रिझर्व्ह बँकेनेच शिक्का मारला आहे. 

- एकूण 15 लाख 41 हजार कोटींच्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांपैकी तब्बल 99.30 टक्के नोटा नोटाबंदीनंतर बँकांमध्ये जमा झाल्या. फक्त दहा हजार कोटींच्याच नोटा रद्द झाल्या असे रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

- म्हणजे डोंगर पोखरून उंदीरदेखील निघाला नाही आणि हा नसलेला उंदीर मारण्यासाठी सरकारने राष्ट्रीय तिजोरीचे व जनतेचे नुकसान केले. 

- ‘नोटाबंदी’च्या निर्णयाने अर्थव्यवस्थेला जणू भडाग्नीच देण्यात आला. जुन्या नोटा रद्द करून नव्या नोटा छापण्यासाठी गेल्या दोन वर्षांत पंधरा हजार कोटी इतका भुर्दंड सहन करावा लागला. देशभरातील एटीएम बदलण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च झाले ते वेगळेच.

- देशाचे इतके प्रचंड व अघोरी नुकसान करूनही राज्यकर्ते विकासाच्या तुताऱया फुंकत असतील तर रोम जळत असताना ‘फिडल’ वाजविणाऱया नीरोसारखीच त्यांची मानसिकता दिसते. 

- रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले आहे. त्या माकडाने देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आग लावली. 

- हजार-पाचशेच्या नोटा रद्द होत असल्याची बातमी गुजरातमधील वर्तमानपत्रात आधीच प्रसिद्ध झाली होती. हा प्रकारसुद्धा धक्कादायक आहे. 

- नोटाबंदीच्या निमित्ताने देशप्रेमाचे धडे देण्यासाठी ‘भगतगण’ पुढे पुढे करीत होते. मात्र ‘झिंगलेल्या माकडा’लाही नोटाबंदीचे ‘सत्य’ लपवणे अवघड झाले आणि हे ‘वास्तव’ त्याच्या अहवालातून समोर आले. मुळात काळय़ा पैशांचे कुणी ढिगारे रचून ठेवत नाही आणि नोटाबंदी झाली म्हणून हा पैसा नष्टदेखील होत नाही हे ग्यानबाचे साधेसोपे अर्थशास्त्र आहे. ज्यांना हे समजले नाही त्यांनी मनमोहन सिंगांना मूर्ख ठरवले. 

- रिझर्व्ह बँकेच्या अहवालाची तरफदारी जो करेल तो देशद्रोही ठरवला जाईल आणि या देशद्रोहाचे समर्थनही कुणी करू नये.

टॅग्स :नोटाबंदीउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभारतीय रिझर्व्ह बँक