Join us  

राहुल गांधींवरील टीका म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ थाटाचा प्रकार, उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 7:36 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली होती. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका करणे म्हणजे हा प्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ थाटाचा आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला आहे.  

''पंतप्रधान मोदी यांना तर ‘युती’ किंवा ‘आघाडी’ धर्म आठवला याचा आम्हाला आनंदच होत आहे. एका बाजूला निवडणुका एकत्र लढण्यासाठी महाआघाडी करायची व दुसऱ्या बाजूला आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न करता परस्पर पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर करायची हे म्हणजे आघाडीतील इतर पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे अशी परखड ‘मन की बात’ पंतप्रधानांनी मांडली, पण हा सर्व प्रकार म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ थाटाचा आहे किंवा अगदीच संसदीय ‘स्वच्छ’ भाषेत समजावून सांगायचे तर ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून’ असेही म्हणता येईल'', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

-काय आहे आजचे सामना संपादकीय?गाढवांचा मालककाँग्रेस पक्षाला २०१९ मध्ये यश मिळाले तर आपल्याला पंतप्रधान व्हायला आवडेल असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले आहे. त्यावर भारतीय जनता पक्षाकडून राहुल यांची खिल्ली उडवली जात आहे.  राहुल गांधी यांचे विधान पक्षांतर्गत लोकशाहीस धरून नाही, ही अरेरावी किंवा अहंकारच असल्याचे मतही भाजपकडून व्यक्त केले जात आहे. २०१९ साली राहुल गांधी पंतप्रधान होतील की खड्डयात जातील हे जनताच ठरवील, पण राहुल गांधी हे उतावीळ, अहंकारी किंवा स्वप्नरंजनात दंग होणारे आहेत. असे बोलणे लोकशाही परंपरेस धरून नाही. तुम्ही लोकशाही मानता ना? त्याच लोकशाहीचे ढोल वाजवत येथे प्रत्येक जण आपापली पाठ मतदारांकडून खाजवून घेत असतो. मग तोच आनंद अन्य कुणी घेत असेल तर भाजपास वाईट का वाटावे? आपल्या देशात लोकशाहीचा अंश शिल्लक असेल तर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या विधानाचे स्वागत करायला हवे व ‘२०१९ च्या रणांगणात आम्ही तुमचा पराभव करू’ असे आव्हान द्यायला हवे होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदाची इच्छा जाहीर करताच भारतीय जनता पक्षाने छाती पिटून घेण्याची गरज नव्हती. पंतप्रधान मोदी यांना तर ‘युती’ किंवा ‘आघाडी’ धर्म आठवला याचा आम्हाला आनंदच होत आहे. एका बाजूला निवडणुका एकत्र लढण्यासाठी महाआघाडी करायची व दुसऱ्या बाजूला आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा न करता परस्पर पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर करायची हे म्हणजे आघाडीतील इतर पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखेच आहे अशी परखड ‘मन की बात’ पंतप्रधानांनी मांडली, पण हा सर्व प्रकार म्हणजे ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान’ थाटाचा आहे किंवा अगदीच संसदीय ‘स्वच्छ’ भाषेत समजावून सांगायचे तर ‘स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून’ असेही म्हणता येईल. काँग्रेसचा आघाडीतील मित्रांशी विसंवाद आहे, असे संवादचतुर भाजपला वाटते. मग राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील जुन्या जाणत्या मित्रांशी तरी भाजपाचा किती संवाद आहे व राष्ट्रीय हिताचे कोणते निर्णय एकोप्याने घेतले? उलट मित्रपक्षांचे जेवढे खच्चीकरण करता येईल तेवढे केले. ज्या मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेवर यायचे, सर्व सत्ताभोग भोगायचे, त्याच सत्तेची तलवार मित्रपक्षाच्या पाठीत खुपसायची हे अघोरी प्रयत्न तर सुरूच आहेत. त्यामुळे ‘यूपीए’तील मित्रपक्षांची चिंता सोडा व आपल्या मित्रपक्षांच्या पाठीत जे खंजीर खुपसले गेले आहेत ते आधी पहा. राहुल गांधी २०१४ साली जसे होते तसे ते आता राहिले नाहीत. अनेक टक्के टोणपे खाऊन ते आता मनाने मजबूत झाल्यासारखे दिसतात. २०१९ साठी ते भाजपसमोर आव्हान उभे करू शकतील इतकी ताकद त्यांनी नक्कीच कमावली आहे हे गुजरात विधानसभा निवडणुकीने सिद्ध केले. भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांची घाणेरडय़ा भाषेत खिल्ली उडवतात, पण पंतप्रधान म्हणून राहुल गांधी हे मोदींचा सन्मान राखतात व खालच्या पातळीवर जाऊन मोदींवर ते घसरत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी यांच्यात राजकीय प्रगल्भता व संस्कार नक्कीच आहेत हे विरोधकांना मान्य करावेच लागेल. काँग्रेस पक्षात व त्यांच्या आघाडीत अनेक ज्येष्ठ लोक रांगेत असताना राहुल गांधी पंतप्रधानपदाची उमेदवारी परस्पर कशी काय जाहीर करू शकतात हा भाजपचा आजचा प्रश्न आहे व या प्रश्नाचे उत्तर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा बुजुर्ग मंडळींनीच द्यायला हवे. राष्ट्रपतीपदाबाबतही तेच म्हणावे लागेल. आम्हीच ज्येष्ठ व श्रेष्ठ श्री. मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला होता. लालकृष्ण आडवाणी किमानपक्षी राष्ट्रपती भवनात तरी जातील असे वाटत होते, पण मोदी-शहांच्या ‘मना’त होते तेच घडले व स्वपक्षातील ज्येष्ठांना व आघाडीतील मित्रपक्षांना फारसे विचारात न घेता सगळे निर्णय झालेच ना? मग काँग्रेसने भाजपवाल्यांना विचारून त्यांच्या पंतप्रधानकीचा उमेदवार घोषित करावा हा हट्ट कशासाठी? राहुल गांधी बरे की वाईट हे जनता ठरवील. श्री. मोदी हे निवडणुकीपूर्वी बरेच होते, पण देशाचे ‘खरे’ झाले काय? समस्या व दुःखे तीच आहेत. जनता गाढवाप्रमाणे ओझे वाहतच आहे. फक्त प्रत्येक निवडणुकीनंतर गाढवांचा मालक बदलतो इतकेच!

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपाराहुल गांधी