Uddhav Thackeray on Maratha Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्यामुळे हजारो मराठा आंदोलक मुंबईच्या सीएसएमटी परिसरात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनीही मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाही अशी ठाम भूमिकां मांडली आहे. मनोज जरांगे यांना संध्याकाळी सहापर्यंत आंदोलनाची अट घालून देण्यात आल्याने सरकार याबाबत काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
"मुंबई ही मराठी माणसांची राजधानी आहे. न्याय हक्कासाठी मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर काय गुजरात गुवाहाटीला जाणार? नाईलाजाने मराठी माणसाला न्याय हक्कासाठी मुंबईला यावं लागलं. कारण या सरकारने सांगितलं होतं की त्यांचे सरकार आले की काही दिवसात न्याय दिला असता. दुसरे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आतापर्यंत या लोकांना वापरून फेकून देण्यात आले. आता ही लोक मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा जो काही न्याय हक्क आहे तो दिला पाहिजे,"
"ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देऊ असं सांगितलं होतं तेच लोक आज सत्तेमध्ये आहेत. कारण मी जरी काही म्हटलं तरी माझ्या हातात काहीच नाही, कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक घेऊन चालवत आहेत हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा. एवढे जर असेल तर जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवू देण्याची वेळ तुम्ही काय येऊ दिलीत," असाही सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
"आतापर्यंत मराठ्यांना खूप वेळा फसवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेण्यात आली. पण याच्यापुढे काही चित्र हाललेले नाही. त्याच्यामुळे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने पुढाकार घेऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मराठी माणसं दंगल करायला नाही तर न्याय हक्कासाठी आलेली आहेत. ज्यांनी आरक्षण देऊ असं म्हटलं होतं ते गावी पळाले आहेत. सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे. दहा जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलकांनी बोला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.