'तेल' थोडे कमी पडले अन् मातीतल्या कुस्तीतले वस्ताद पवारांनी 'गदा' जिंकली- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 08:38 AM2019-10-25T08:38:45+5:302019-10-25T08:39:25+5:30

राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महायुतीला अपेक्षित असलेला प्रतिसाद जनतेनं दिलेला नाही,

Uddhav Thackeray criticize bjp on sharad pawar | 'तेल' थोडे कमी पडले अन् मातीतल्या कुस्तीतले वस्ताद पवारांनी 'गदा' जिंकली- उद्धव ठाकरे

'तेल' थोडे कमी पडले अन् मातीतल्या कुस्तीतले वस्ताद पवारांनी 'गदा' जिंकली- उद्धव ठाकरे

Next

मुंबईः राज्यातील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. महायुतीला अपेक्षित असलेला प्रतिसाद जनतेनं दिलेला नाही, तसेच सेना- भाजपानं दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या बऱ्याच उमेदवारांना जनतेनं झिडकारलं. भाजपा 122 वरून 102वर घसरला, तर शिवसेनेलाही जवळपास 7 जागांचा फटका बसला. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी जनतेनं दिलेला कौल मान्य असल्याचं सांगितलं.

तसेच उद्धव ठाकरेंनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावरही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शरद पवार यांच्या नेतृत्वाचाही पुन्हा कस लागला. एका जिद्दीने ते लढले. मुख्यमंत्र्यांनी स्वतःला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहेलवान म्हणून घोषित केले; पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते 'तेल' थोडे कमी पडले व मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी 'गदा' जिंकली, असा टोला उद्धव ठाकरेंनी पवारांवर स्तुतिसुमनं उधळत भाजपाला लगावला.  

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

  • जनतेने कौल दिला आहे. तो स्वीकारून आम्ही महाराष्ट्राला आज आहे त्यापेक्षा निश्चितच पुढे घेऊन जाऊ. हे राज्य शिवरायांचे आहे. त्यामुळे जो कौल जनतेने दिला त्यामागे शिवरायांची प्रेरणा नक्कीच असेल . 
  • महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचा उतमात मान्य नव्हता आणि नाही . आमचे पाय जमिनीवरच होते आणि आहेत. 
  • महाराष्ट्राच्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मऱ्हाटी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही 
  • दिलेल्या शब्दास जागणारा ' राजा ' अशी छत्रपती शिवरायांची ख्याती होती . हे राज्य शिवरायांच्या प्रेरणेनेच चालेल !महाराष्ट्राच्या जनतेचा कौल स्पष्ट आणि सरळ आहे. 
  • उतू नका मातू नका नाहीतर माती होईल, असा जनादेश देणारा निकाल 'ईव्हीएम' मधून बाहेर आला. 'ईव्हीएम'मधून फक्त कमळेच बाहेर येतील असा आत्मविश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होता. 
  • 164 पैकी 63 ठिकाणी कमळे फुलली नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राचे निकाल पाहता शिवसेना - भाजपा युतीस सरकार स्थापन करण्याइतके बहुमत मिळाले आहे. 
  • 'आकड्यां'चा खेळ संसदीय लोकशाहीत चालत असतो. 'युती'चा आकडा स्पष्ट बहुमताचा आहे. शिवसेना आणि भाजपा मिळून 160 च्या आसपास आकडा आला. 
  • महाराष्ट्राच्या जनतेने ठरवून दिलेला हा निकाल आहे. मग त्यास महाजनादेश म्हणा नाही तर आणखी काही . हा जनादेश आहे. महाजनादेश नाही हे मान्य करावे लागेल. 
  • जनतेचा कौल स्वीकारण्याचा मनाचा मोठेपणा दाखवावाच लागतो . आम्ही हा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे . महाराष्ट्रात 2014 पेक्षा वेगळा निकाल लागला आहे. 
  • 2014 साली 'युती' नव्हती. 2019 साली ' युती ' असतानाही जागांची घसरण झाली. बहुमत मिळाले , पण काँग्रेस - राष्ट्रवादीने मिळून शंभर जागांचा टप्पा गाठला. 
  • एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून मतदारांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकली . हा एक प्रकारे सत्ताधाऱ्यांना मिळालेला धडा आहे . धाक , दहशत , सत्तेची मस्ती यास बळी न पडता जनतेने जे मतदान केले त्याबद्दल तिचे अभिनंदन ! 
  • काँग्रेसला कोणतेही नेतृत्व नव्हते . त्या बिनधडाच्या काँग्रेसला राज्यात 44-45 च्या आसपास जागा मिळाल्या. भाजपानं राष्ट्रवादी अशी काही फोडली की, हा पवारांचा पक्ष तोळामांसाचा तरी शिल्लक राहील काय, असा माहोल झाला . 
  • महाराष्ट्रात सर्वात जास्त उसळी राष्ट्रवादीने मारली आहे व त्यांनी पन्नाशी पार केली. भाजप 122 वरून 102 वर घसरला. शिवसेना 63 वरून खाली आली. 
  • याशिवाय इतरही अपक्ष, बंडखोर, छोटे पक्ष मिळून पंचवीस जणांना विजय मिळाला आहे. तसे म्हटले तर हा कौल अधांतरी आहे. 
  • दुसऱ्या शब्दात सांगायचे तर '' फार शहाणपणा करू नका . उतू नका , मातू नका . सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा !'' असा जनादेश राज्याच्या जनतेने दिला आहे. 
  • सत्तेचा उतमात करून राजकारणात कोणालाही कायमचे संपवता येत नाही आणि ' हम करे सो कायदा ' चालत नाही . स्वबळावर भाजपला बहुमत मिळवता आले नाही.
  •  पक्ष फोडून व पक्षांतरे घडवून मोठा विजय मिळवता येतो हा भ्रमाचा भोपळा राज्याच्या जनतेने फोडला. पक्षांतरे करून ' टोप्या ' बदलणाऱ्यांना जनतेने घरी पाठवले आहे. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा दारुण पराभव झाला. 
  • शिवरायांचे वंशज म्हणून कॉलर उडवत फिरणाऱ्या उदयनराजे यांचे वर्तन नीतिमत्तेचे असायला हवे होते . सातारची गादी छत्रपती शिवरायांची म्हणून मानसन्मान आहे. 
  • छत्रपतींचे नाव घेऊन कुणी अल्टी - पल्टी करत असेल तर चालणार नाही हे सातारकरांनी दाखवून दिले. उदयनराजे भोसले यांचा हा व्यक्तिगत पराभव आहे. 
  • शिवसेना-भाजप यांनी 'युती' म्हणून लढूनही राष्ट्रवादी व काँग्रेसला इतके यश का मिळाले? पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात दहा सभा घेतल्या. अमित शहा यांनी 370 कलमावर चाळीस सभा घेतल्या. 
  • उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोदी यांनी साताऱ्यात खास सभा घेतली. उदयनराजे यांचे पक्षांतर दिल्लीत अमित शहा यांच्या बंगल्याच्या हिरवळीवर झाले.
  • सातारचे छत्रपतीच भाजपसोबत असल्याने महाराष्ट्रात आपल्यालाच शिवरायांचा आशीर्वाद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले; पण सातारच्या जनतेने उदयनराजे यांचा पराभव केला. 
  • यापासून काय तो धडा घेणे गरजेचे आहे. मोठ्या विजयाचे स्वप्न भंग पावले; पण सत्ता राखता आली इतकेच काय ते समाधान. शरद पवार यांच्या नेतृत्वाचाही पुन्हा कस लागला. 
  • मुख्यमंत्र्यांनी स्वतःला महाराष्ट्रातील तेल लावलेला शक्तिशाली पहिलवान म्हणून घोषित केले; पण मोठ्या मनाने मान्य केले पाहिजे की ते 'तेल' थोडे कमी पडले.
  • मातीतल्या कुस्तीतले वस्ताद म्हणून शरद पवार यांनी 'गदा' जिंकली आहे. संपूर्ण निवडणूक निकालांचे विश्लेषण आजच करता येणार नाही. जनतेने कौल दिला आहे. 

Web Title: Uddhav Thackeray criticize bjp on sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.