गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 06:46 IST2025-08-13T06:46:06+5:302025-08-13T06:46:38+5:30

गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ठाकरे यांची टीका

Uddhav Thackeray criticism at the Ganeshotsav mandal meeting | गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा

गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा

मुंबई : मुंबईत मंडपासाठी खड्डे खोदल्यास गणेश मंडळांना १५ हजार दंड लावण्यात येणार आहे. हा दंड गणेश मंडळे भरणार नाहीत. गणेशोत्सवासाठी कोकणात गोवा-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांची प्रवासात हाडे खिळखिळी होतात. हा रस्ता पूर्ण न करू शकणाऱ्या व खड्डे न बुजविणाऱ्या सरकारलाच दंड लावण्याची वेळ आली आहे, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

रंगशारदा येथे मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. हिंदी सक्तीविरोधात आंदोलन केल्यावर तो जीआर मागे घेतला. अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांची समिती नेमली त्यांचा भाषेशी काही संबंध नाही. 'पीओपी'साठी काकोडकर यांची समिती नेमली. अणुऊर्जेचे समर्थन करणाऱ्यांना पर्यावरणतज्ज्ञ नेमून आम्हाला धडे देऊ नयेत. त्यांची दंडके मानणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

'पीओपी'बाबत निर्णय घ्यायचा असेल तर कायमचा घ्या. किती उंची ठेवायची? माती कुठून आणायची ? यांसारखे अनेक प्रश्न आहेत ते कायमचे मिटवून टाका. आरे जंगलतोड, कांजूरमार्ग प्रकल्प, गारगाई पिंजाळ योजना यामुळे लाखो झाडांची होणारी कत्तल, पर्यावरण कार्यकर्त्यांवरील कारवाई यांचा उल्लेख करत ठाकरे यांनी सरकारवर पर्यावरण हानीचे आरोप केले.

पालिकेत सत्ता आमचीच येणार आमदार, खासदार, माजी नगरसेवक पळवून झाले आता गणेश मंडळे पळवीत आहेत. मंडळे पळविली तरी आतील गणपती बाप्पाचे आशीर्वाद आमच्यासोबत आहे. कितीही पळवापळवी केली तरी पर्वा नाही. ते दुसरे काय करू शकणार? राज्यात काही काळ आपली सत्ता होती. महापालिका सतत शिवसेनेकडे होती आणि यापुढेही आपलीच सत्ता राहणार, अशा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.
 

Web Title: Uddhav Thackeray criticism at the Ganeshotsav mandal meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.