“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 09:13 IST2025-08-13T09:10:57+5:302025-08-13T09:13:54+5:30
Uddhav Thackeray News: जनतेच्या न्यायहक्कासाठी आपण लढत राहू. आता यांची सत्ता जाण्याची वेळ आली आहे. यांची नाटके लोकांनी ओळखली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
Uddhav Thackeray News: मुंबईत मंडपासाठी खड्डे खोदल्यास गणेश मंडळांना १५ हजार दंड लावण्यात येणार आहे. हा दंड गणेश मंडळे भरणार नाहीत. गणेशोत्सवासाठी कोकणात गोवा-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांची प्रवासात हाडे खिळखिळी होतात. हा रस्ता पूर्ण न करू शकणाऱ्या व खड्डे न बुजविणाऱ्या सरकारलाच दंड लावण्याची वेळ आली आहे, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
एकीकडे उद्धव ठाकरे गटाला मोठे खिंडार पडत असून, पक्ष गळती थांबताना दिसत नाही. यातच ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विदर्भ व मुंबईतील भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना मोठा दावा केला.
मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे
हे लोक मतांची चोरी करून सत्तेत बसले आहेत. ती चोरी आता पकडली गेली आहे. सत्तेच्या नादी लागून अनेकजण सत्ताधारी महायुतीत गेले, पण भाजपाची सत्ता जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे आता ते कपाळावर हात लावून बसलेत. सर्वजण देशात जे काही सुरू आहे, ते पाहत आहोत. ३०० खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार होते. पण त्यांना जाऊ दिले गेले नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांना अटक करण्यात आली. पण आता एकेक करून आपल्या डोळ्यांवरच्या पट्ट्या निघत आहे. आता यांची सत्ता जाण्याची वेळ आली आहे. यांची नाटके लोकांनी ओळखली आहेत, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
महाराष्ट्रात बेबंदशाही असल्यासारखा भ्रष्टाचार बोकाळला
महाराष्ट्रात बेबंदशाही असल्यासारखा भ्रष्टाचार बोकाळला आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. कारण, भ्रष्टाचार केल्याने कुणाला काहीच फरक पडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जर पुराव्यानिशी त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगला तरी त्या मंत्र्यांवर कारवाई करायची नाही. त्यामुळे आपण आणखी किती दिवस हे सहन करायचे? दोन-तीन वर्षांपूर्वी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी दिल्लीला जात होते. पण केंद्र सरकारने त्यांच्या मार्गात खिळे रोवले. मोठे लोखंडी अडथळे उभे केले. जे खासदार जनतेने निवडून दिले आहेत, त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. जनतेच्या न्यायहक्कासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला.