“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:08 IST2025-11-28T17:08:02+5:302025-11-28T17:08:30+5:30
Uddhav Thackeray PC News: तिकडे अयोध्येत जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अदानी”, असे काम करायचे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray PC News: भाजपचे हिंदुत्व हे थोतांड आहे. पंतप्रधान मोदी अयोध्येत जाऊन रामध्वजारोहण करत आहेत. तिकडे जाऊन ‘राम राम’ करायचे आणि नाशिकमध्ये “मुंह में राम, बगल में अदानी”, असे काम करायचे, अशा हिंदुत्वाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही. हे हाणून पाडलेच पाहिजे. तपोवनासारखी पवित्र जागा कंत्राटी स्वार्थासाठी मारली जात आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, नाशिकचा विषय आहे, पण मी इकडे मुंबईत घेत आहे, याचे कारण मुंबईने हे भोगले आहे. आता नाशिकचा क्रमांक आहे. स्थानिक लोकांसोबत आम्ही आहोत. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या निमित्ताने तपोवनातील हजारो वृक्ष तोडले जाणार आहेत. रामायणात प्रभू श्रीरामांच्या चरणांनी ही भूमी पावन झालेली आहे, असे म्हटले जाते. अशा पावन भूमीतील वृक्ष तोडण्याची गरज नाही. भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्यामुळेच हा प्रकार केला जात आहे, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
विरोध कुंभमेळा किंवा साधूग्रामला नाही
हा केवळ एका शहराचा विषय आहे. त्यामुळे सर्व निसर्गप्रेमींनी याला विरोध केला पाहिजे. आमचा विरोध कुंभमेळा किंवा साधूग्रामला नाही. पण वृक्षांची कत्तल करून काही काम करू दिले जाणार नाही. निसर्ग विनाशाचा प्रयत्न असून, यात हिंदुत्वाचा आडोसा घेतला जात आहे. गेल्या कुंभमेळ्यात वापरलेली जागा यावेळी का वापरली जात नाही, नवी झाडे लावण्याइतकी रिकामी जागा असल्याचे सांगितले जाते तर साधुग्राम तिथेच का उभारला जात नाही? आधी निसर्ग मारायचा आणि नंतर “नवीन झाडे लावू” असा दिखावा करण्याचा हा भ्रष्टाचार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
दरम्यान, माझ्या हातात टेंडरचा एक कागद आहे. टेडरच्या दस्तऐवजात तपोवन परिसरात पुढे कॉन्फरन्स हॉल आणि कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याची स्पष्ट नोंद आहे. त्यामुळे कुंभमेळा हा फक्त कारण म्हणून पुढे केला जात असून, प्रत्यक्षात हा कंत्राटदारांचा विकास करण्याचा डाव आहे. उद्या तपोवन ही भूमी कोणाच्या तरी घशात घालण्यासाठीच झाडे नष्ट केली जात आहेत, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.