राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 11:51 IST2025-09-13T11:50:52+5:302025-09-13T11:51:59+5:30
Maharashtra Politics: महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्यास सांगितले.

राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
Uddhav Thackeray: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जवळीक वाढताना दिसत आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्याने दोन्ही पक्षांमधील युतीच्या चर्चा वाढल्या आहेत. मात्र यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की मनसे आघाडीमध्ये सामील होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. २० वर्षांनी दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने महापालिका निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता दोन्ही पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबत जायचं की महाविकास आघाडीसोबत याचा निर्णय पदाधिकाऱ्यांवर सोडला आहे.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन अडीच तास चर्चा केली. यावेळी मनसेसोबत युतीसाठी ते सकारात्मक आहेत त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला तयार आहेत, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि युतीसंदर्भात चर्चा केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मातोश्री निवासस्थानी ठाकरे यांनी विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती हवी की महाविकास आघाडी हवी, याबाबत स्थानिक पातळीवरील आपली मते मांडावीत असं उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. तसेच, स्थानिक पातळीवर जागा वाटपाला उशीर न करता लवकर निर्णय घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांना दिले.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याची कल्पना काँग्रेस नेत्यांना दिली. त्यामुळे आता महाविकास आघाडील काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आशिया क्रिकेट चषकातील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी देऊन पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला आहे. त्यामुळे १४ तारखेला सामन्याच्या दिवशी आक्रमकपणे आंदोलन करून महिला आघाडीने पंतप्रधानांना सिंदूर पाठवावे, असेही निर्देश ठाकरे यांनी यावेळी दिले.