...तर आणि तरच घराबाहेर पडा; कारण या युद्धात शत्रू कुठूनही हल्ला करू शकतो; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:54 IST2020-03-25T13:02:22+5:302020-03-25T14:54:07+5:30
घराबाहेर आपण पाऊल टाकलं, तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल,

...तर आणि तरच घराबाहेर पडा; कारण या युद्धात शत्रू कुठूनही हल्ला करू शकतो; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबईः कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, देशभरात संचारबंदी करण्यात आली आहे. राज्य सरकारनंही कोरोनाला निष्प्रभ करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत जनतेशी संवाद साधला आहे. काल रात्री थोडीशी धावपळ झाली, गोंधळाची परिस्थिती होती, थोडीशी अस्वस्थता होती. आज सकाळी सकाळी आलो असतो तर पुन्हा तुमच्या छातीत धस्स झालं असतं. हा पुन्हा आता काय सांगतोय, असं तुम्हाला वाटलं असतं. सगळ्यांनाच कोरोना व्हायरस आणि त्याच्या संकटाबाबत पूर्ण कल्पना आलेली आहे. युद्ध हे युद्ध असतं, त्यात शत्रू नकळत आपल्यावर वार करत असतो.
६५ आणि ७१ ची युद्धं शत्रूला रडारवरची विमानं कशी दिसणार नाहीत, अशा प्रकारे लढली गेली. शत्रू गाफील असताना हल्ला करणं हे आपल्या दुश्मनाचं काम असतं. घराबाहेर आपण पाऊल टाकलं, तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. हातावर पोट असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं किमान वेतन थांबवू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे. कोरोना व्हायरस या संकटाच्या गांभीर्याबद्दल जनतेला जाणीव होतेय. मी या लढाईची तुलना युद्धाशी केली आहे. युद्ध हे युद्ध असतं. शत्रू नकळत वार करत असतो. हा शत्रू तर दिसतही नाही. त्यामुळे कुठून हल्ला करेल सांगता येत नाही. घराबाहेर पडू नका.
कोरोनाच्या निमित्ताने कुटुंब एकत्र आली ही सकारात्मक बाब आहे. एसी बंद करा. खिडक्या उघड्या टाका. मोकळ्या हवेत श्वास घ्या. मी 'मिसेस मुख्यमंत्र्यां'चं ऐकतो, तुम्ही 'होम मिनिस्टर'चं ऐका. अन्नधान्याचा पुरेसा साठा आहे. औषधं, धान्य, भाजीपाला, पशुखाद्य, दवाखाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहतील. शेतीची कामं सुरू राहतील. शेतमालाची वाहतूक सुरू राहील. कंपनी बंद ठेवली असेल तरी हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांचं किमान वेतन थांबवू नका. औषधं, भाजीपाला आणायचा तरच घराबाहेर पडा. शक्यतो एकट्यानेच जा. शिवरायांचा महाराष्ट्र लढवय्या. हे युद्ध जिंकणारच. गुढीपाडवा साजरा करायचाय, पण आत्ता नाही. या संकटावर मात करून विजयाची गुढी उभारू या, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं आहे.