नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:39 IST2025-07-16T18:19:42+5:302025-07-16T19:39:57+5:30

अंबादास दानवेंच्या निरोपसमारंभाच्या फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

Uddhav Thackeray and Eknath Shinde were seen together at the photo session of Ambadas Danve farewell ceremony | नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर

नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर

Maharashtra Monsoon Session 2025: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभ आज पार पडला. विधान परिषदेत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना अंबादास दानवेंचे जोरदार कौतुक केलं. त्यानंतर विधिमंडळाच्या परिसरामध्ये फोटोसेशनवेळी अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. अंबादास दानवेंच्या निरोपाचे फोटोसेशन सुरु असताना उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकद समोरासमोर आले. एकाच फोटोफ्रेमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे एकत्र बसले होते मात्र त्यांमध्ये फक्त एकाच खुर्चीचे अंतर होते. यावेळी दोघांनीही एकमेकांशी बोलणे टाळले. त्यानंतर आता या फोटोफ्रेमची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांचा निरोपसमारंभ पार पडल्यानंतर विधिमंडळपरिसरात परंपरेप्रमाणे फोटो सेशन घेण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडेच सर्वांच्या नजरा होत्या. सुरुवातील सत्ताधाऱ्यांसोबत फोटोसेशन पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे आगमन झालं. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यासह सर्व प्रमुख नेते उभे राहिले. त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. नीलम गोऱ्हे एकडे बसा म्हणून आग्रह करत होत्या मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना नकार दिला. त्यानंतर ते नीलम गोऱ्हे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शेजारी जाऊन बसले. मात्र यावेळी दोघांनीही एकमेकांना पाहिलं नाही किंवा संवादही साधला नाही. त्यामुळे या घटनेची जोरदार चर्चा सुरु झालीय. 

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या निमित्तानं विधानभवनाच्या आवारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित होते.

अंबादास दानवेंच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसल्याचं म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलं. अनेकजण पद मिळण्यासाठी फडफडत असतात. अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही. ज्यांनी ताट वाढून दिलं त्या पक्षाशी तुम्ही प्रतारणा केली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 

Web Title: Uddhav Thackeray and Eknath Shinde were seen together at the photo session of Ambadas Danve farewell ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.