भाजपाकडून चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेचे दावे केले जात असतानाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्री निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून, दोन मागण्यांचे प्रस्ताव वडेट्टीवारांसमोर ठेवले आहेत. यात महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर कोण? या गोष्टींचा समावेश आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, "जवळपास अर्धा तास आम्ही चर्चा केली. चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी, अशी आम्ही त्यांना विनंती केली. त्यासंदर्भात उद्धवजी सकारात्मक आहे आणि शंभर टक्के महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे."
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष वाटाघाटी
"त्यांनी एक प्रस्ताव पुढे ठेवला आहे. महापौर पद हे अडीच अडीच वर्षासाठी जर होत असेल, तर तशी तयारी केली पाहिजे, असे त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर स्थायी समिती सुद्धा अडीच अडीच वर्षासाठी. आमची चर्चा सकारात्मक झाली. प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करू. त्यांच्या कानावर ही चर्चा घालणार आहे", अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
वडेट्टीवार म्हणाले की, "मला नाही वाटत की, कुठेही काहीही अडचण येईल. आम्ही राज्यात महाविकास आघाडी म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. चंद्रपूरमध्येही एकत्र आलो तर अधिक मजबुतीने काम करता येईल. यातून चांगलं घडेल, असं मला वाटतं."
अडीच-अडीच वर्षे महापौर करण्यात आम्हाला अडचण नाही
"महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष अडीच-अडीच वर्षे वाटणी करावी, असे ते म्हणाले आहेत. आमचीही त्याला काहीच अडचण नाहीये. मला वाटतं की, संख्याबळ अगदी काठावर असून चालत नाही. मजबूत संख्याबळ असले की, पाच वर्षे महापालिकेत सत्तेत काम करता येईल आणि निर्णय घेता येईल. चांगले बहुमत राहिले तर निर्णय क्षमता चांगली राहते. खुर्चीवर बसणाऱ्यांना व्यवस्थित काम करता येते", अशी भूमिका वडेट्टीवार यांनी ठाकरेंच्या भेटीनंतर मांडली.
महापौर कोण, उद्धवसेना ठरवणार?
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "त्यांची दुसरी पण अट आहे की महापौर कुणाचा असावा? तो ठरवताना उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिडे यांच्याशी चर्चा करून समन्वयाने एक नाव निवडले पाहिजे. त्यांना पण आणि आम्हाला चालेल, अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचं खरं आहे की, शेवटी त्या खुर्चीवर बसणाऱ्याने सगळ्यांना घेऊन चालले पाहिजे.
पहिले अडीच वर्षे महापौर कुणाचा?
आम्ही त्यांना विनंती केली की, पहिले अडीच वर्षे आम्हाला द्यावे. तिथल्या जिल्हाप्रमुखांशी बोलून ते आम्हाला संध्याकाळपर्यंत निर्णय कळवणार आहेत. आमचीही आज संध्याकाळपर्यंत चर्चा होईल", असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
Web Summary : Uddhav Thackeray is positive about forming an alliance in Chandrapur. He proposed sharing the Mayor and Standing Committee Chairperson posts for two and a half years each, and wants to decide the mayor's name jointly with local leaders.
Web Summary : उद्धव ठाकरे चंद्रपुर में गठबंधन बनाने को लेकर सकारात्मक हैं। उन्होंने महापौर और स्थायी समिति अध्यक्ष पदों को ढाई-ढाई साल के लिए साझा करने का प्रस्ताव रखा, और स्थानीय नेताओं के साथ मिलकर महापौर का नाम तय करना चाहते हैं।