उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 06:34 IST2025-12-27T06:33:34+5:302025-12-27T06:34:02+5:30
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत २५ उमेदवार उभे केले होते. यातील शिवडी मतदारसंघात उद्धवसेनेचे अजय चौधरी व मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत झाली होती.

उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी युतीची घोषणा केली. पण, जागावाटपाचे सूत्र ठाकरे बंधूंनी जाहीर केलेले नाही. मात्र, उद्धवसेना व मनसे युतीमुळे मुंबईतील ६७ प्रभागांत दोन्ही पक्षांची ताकद अधिक वाढली आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत २५ उमेदवार उभे केले होते. यातील शिवडी मतदारसंघात उद्धवसेनेचे अजय चौधरी व मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत झाली होती. तर, अन्य २४ पैकी मनसेने महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांना लढत दिली होती. यातील १९ मतदारसंघात उद्धवसेना व मनसे एकमेकांविरोधात लढले होते.
विधानसभा निवडणुकीत प्रभागनिहाय मिळालेल्या मतांनुसार मनसेने मराठीबहुल वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप अशा विधानसभेतील एकूण ६७ प्रभागांपैकी ३९ प्रभागांत मविआचे तर २८ प्रभागांत महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते. माहीममध्ये अमित ठाकरे (मनसे), महेश सावंत (उद्धवसेना), सदा सरवणकर (शिंदेसेना) अशी तिरंगी लढत झाली होती. यात सरवणकर यांनी आघाडी घेतलेल्या १९१ व १९२ प्रभागात मनसे व उद्धवसेनेच्या मतांची बेरीज त्यांच्या मतांपेक्षा दुप्पट आहे.
वरळी, दिंडोशीतही बेरीज मोठी
वरळीमध्येही आदित्य ठाकरे (उद्धवसेना), संदीप देशपांडे (मनसे) व मिलिंद देवरा (शिंदेसेना) यांच्या लढतीत प्रभाग १९९ व १९४ मधून देवरांना जास्त मते मिळाली होती. मात्र, ठाकरे, देशपांडे यांच्या मतांच्या बेरजेच्या तुलनेने ती कमी आहेत. दिंडोशी विधानसभेत मनसेने ७ पैकी ६ प्रभागात विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते घेतली होती. प्रभाग ३७ मध्ये शिंदेसेनेचे संजय निरुपम यांनी ११,८१० मते घेतली. उद्धवसेनेचे सुनील प्रभू यांना ८,९७४ तर मनसेचे भास्कर परब यांना ३,१०१ मते मिळाली. प्रभू व परब यांच्या मतांचे एकत्रीकरण केल्यास ते निरूपम यांच्या पुढे आहे. यामुळेच मनसे, उद्धवसेनेची युती ठाकरे बंधूंना पूरक ठरून मराठीबहुल पट्ट्यात त्यांची ताकद वाढविणारी ठरणार आहे.