Join us  

भाजपाच्या दुसऱ्या यादीतही उदयनराजेंना स्थान नाही; सातारा वेटींग लिस्टमध्येच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 6:03 PM

आता भाजपाने ३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, तरीही उदयनराजेंच्या नावाची घोषणा झालेली नाही. 

मुंबई/सातारा - एकीकडे उन्हाचा पारा चढला असताना राजकीय वातावरणही तापायला लागले आहे. लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटप आणि उमेदवारांच्या नावांच्या घोषणेनंतर राजी-नाराजी व बंडखोरीचा सूर दिसून येत आहेत. भाजपाने राज्यात आत्तापर्यंत २३ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. तर, काँग्रेसने महाराष्ट्रात १२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. मात्र, भाजपाने जाहीर केलेल्या पहिल्या २० जणांच्या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्याने त्यांच्या समर्थकांनी भाजपाविरुद्ध भूमिका घेतली होती. तसेच, साताऱ्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही देऊ केले होते. मात्र, आता भाजपाने ३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, तरीही उदयनराजेंच्या नावाची घोषणा झालेली नाही. 

माझ्याकडे विमान, रेल्वे अशी सर्व तिकीटे आहेत, लोकसभेचे माहिती नाही, असे म्हणत भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी पहिल्या यादीत नाव जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांची भेट घेत त्यांनी दिल्ली गाठली. गेल्या आठवड्यापासून ते दिल्लीत असून गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीच्या प्रतिक्षेत होते, असे वृत्त माध्यमात आले आहे. कारण, साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी महायुतीत मोठी रस्सीखेच असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षानेही येथे दावा केला आहे. तर, उदयनराजे भोसले हेही याच जागेसाठी आग्रही आहेत. मात्र, भाजपाने महाराष्ट्रासाठी ३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. सोलापूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, दुसऱ्या यादीही साताऱ्यातून उमेदवाराची घोषणा नाही. त्यामुळे, साताऱ्यातून उमेदवारीसाठी आग्रही, इच्छुक असलेल्या उदयनराजे भोसलेंना अद्यापही वेटींगवरच राहावे लागले आहे.

भाजपाने रविवारी रात्री ३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये, सोलापुरातून आमदार राम सातपुते, भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सातारा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या प्रमुख मतदारसंघातील उमेदवार ठरलेला नाही. मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर आणि दिल्लीतील फडणवीसांच्या भेटीनंतर दुसऱ्या यादीत साताऱ्यातून उदयनराजेंना तिकीट मिळेल, अशी अपेक्षा साताऱ्यातील त्यांच्या समर्थकांना होती. मात्र, भाजपाच्या दुसऱ्या यादीतूनही निराशाच पदरी पडली आहे. त्यामुळे, अद्यापही वेट अँड वॉच अशीच भूमिका दिसून येत आहे.  

नरेंद्र पाटील यांनीही मागितली उमेदवारी

उदयनराजेंना तिकीट मिळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात असताना एकेकाळी शिवसेनेकडून लढलेल्या नरेंद्र पाटलांनी भाजपाकडे तिकीट मागितल्याने साताऱ्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'गेल्या वेळी मी शिवसेनेकडून लढलो होतो. उदयनराजेंविरोधात लढायला कुणीच तयार होत नव्हता. पण मी लढलो आणि चार लाखांच्यावर मते घेतली होती. उदयनराजे यांच्यापेक्षा मला ३० ते ३५ हजार मतं कमी होती. सातारा लोकसभा मतदार संघात माझी चांगली पकड आहे, त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी, फडणवीस ती संधी देतील अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आधीच राष्ट्रवादी अजित पवार, त्यात नरेंद्र पाटील यांच्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे.  

टॅग्स :अमित शाहसाताराभाजपालोकसभा निवडणूक २०२४निवडणूक