ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:10 IST2025-12-23T11:09:57+5:302025-12-23T11:10:33+5:30
BMC Election Seat Sharing: दादरमधील तिढा असलेल्या दोन प्रभागांपैकी प्रत्येकी एक प्रभाग दोन्ही पक्षांना मिळाला आहे. तर पेच निर्माण झालेल्या शिवडीतील तीनपैकी उद्धवसेना २ तर १ प्रभाग मनसेला मिळाला आहे.

ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्धवसेना व मनसेमधील जागा वाटपाच्या चर्चेत दादर-माहीम व शिवडी या विधानसभा मतदारसंघातील प्रभागावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे.
दादरमधील तिढा असलेल्या दोन प्रभागांपैकी प्रत्येकी एक प्रभाग दोन्ही पक्षांना मिळाला आहे. तर पेच निर्माण झालेल्या शिवडीतील तीनपैकी उद्धवसेना २ तर १ प्रभाग मनसेला मिळाला आहे. मात्र, शिवडीत एक प्रभाग मिळाल्याने नाराज झालेले मनसे विभागाध्यक्ष संतोष नलावडे यांनी ‘शिवतीर्थ’ गाठून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे किमान २ जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे.
शिवडी विधानसभेतील पाचपैकी २०३, २०४ व २०५ या तीन प्रभागांवरून पेच निर्माण झाला होता. २०१७ च्या निवडणुकीत तिन्ही प्रभागांत निवडून आलेले माजी नगरसेवक उद्धवसेनेसोबत आहेत. परंतु, विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेचे अजय चौधरी व मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या लढतीत २०४ व २०५ मध्ये मनसेला जास्त मते मिळाली. त्यामुळे शिवडीतील ५ पैकी २ प्रभाग मिळावेत, अशी मनसेची मागणी होती. मात्र, या तीनपैकी एक जागा मनसेला तर २ जागा उद्धवसेनेला सोडल्या आहेत.
या प्रभागांवर दावा
१९२ व १९४ प्रभागांवर दोन्ही सेनेने दावा केला होता. २०१७ च्या निवडणुकीत १९२ मधून मनसेच्या स्नेहल जाधव यांचा उद्धवसेनेच्या प्रीती पाटणकर यांनी पराभव केला होता. हा प्रभाग उद्धवसेनेला सोडल्याने पाटणकर यांना दिलासा मिळाला, तर जाधव यांना कुठे संधी मिळणार? हा प्रश्न आहे.
प्रभाग उद्धवसेना मनसे
२०३ १३,०३८ १३,०२७
२०४ ११,२४५ १३,३०७
२०५ १२,८६८ १३,५९२