चायनिज मांजाने चिरला गळा; खोलवर जखम, अंधेरी उड्डाणपुलावर धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 08:19 IST2026-01-15T08:19:10+5:302026-01-15T08:19:26+5:30
दुचाकीस्वार जखमी

चायनिज मांजाने चिरला गळा; खोलवर जखम, अंधेरी उड्डाणपुलावर धक्कादायक प्रकार
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी वापरलेल्या नॉयलॉन मांज्यामुळे पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाल्याचे उघडकीस आले. बोरीवली येथील रहिवासी भारत कदम (४५) हे अंधेरी उड्डाणपुलावरून दुचाकीने जात असताना त्यांच्या गळ्याभोवती मांजा अडकल्याने खोलवर जखम झाली. त्याला सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमीचा भाऊ संतोष कदम याने दिलेल्या माहितीनुसार, 'भारत रोज दुचाकीने सांताक्रूझला ऑफिसला जातो. दुपारी सुमारे २ च्या सुमारास तो अंधेरी उड्डाणपुलावर पोहोचला असताना अचानक मांजा त्याच्या गळ्याभोवती अडकल्याने तो जखमी झाला. त्याने स्वतः फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तो उड्डाणपुलावरून रिक्षाने रुग्णालयात गेला.
थोडक्यात बचावली श्वसननलिका
गळ्याला खोल जखम झाल्याने उपचारांसाठी प्लास्टिक सर्जन आणि इतर डॉक्टरांना रुग्णालयात बोलावण्यात आले आहे. जखम श्वसननलिकापर्यंत खोल होती, मात्र श्वासनळीला इजा झालेली नाही. गळ्याच्या दोन्ही बाजूंना जखमा झाल्या असून, अनेक टाके घालण्यात आले आहेत. रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या अपघात विभागातील डॉक्टरांनी 'लोकमत'ला सांगितले.
पोलिसांकडून तपास सुरू
अपघाताची माहिती समजताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दुचाकी घटनास्थळावरून उचलून अंधेरी वाहतूक चौकीत नेली. खांबात अडकलेला मांजा काढून अंधेरी पोलिसांकडे सुपूर्द केल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अंधेरी पोलिसांनी सांगितले.