एकाच क्रमांकाच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण मुलुंडमधील ऑर्किड इंटरनॅशनल शाळेची बस जप्त; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:09 IST2025-12-19T13:09:32+5:302025-12-19T13:09:49+5:30
मुलुंड पूर्वच्या ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलची एकाच क्रमांकाच्या दोन स्कूलबस आरटीओच्या हाती लागल्या आहेत.

एकाच क्रमांकाच्या दोन स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची ने-आण मुलुंडमधील ऑर्किड इंटरनॅशनल शाळेची बस जप्त; गुन्हा दाखल
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण करणारा धक्कादायक प्रकार वडाळा प्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईतून समोर आला आहे. मुलुंड पूर्वच्या ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलची एकाच क्रमांकाच्या दोन स्कूलबस आरटीओच्या हाती लागल्या आहेत. त्यामध्ये दोन वेगवेगळे चेसिस क्रमांक आढळून आले आहेत. बनावट नंबरप्लेटद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू होती. याप्रकरणी नवघर पोलिसांनी स्कूलबस जप्त करत ऑर्किड स्कूलचे संचालक, मुख्याध्यापक तसेच बसचा चालक व इतरांविरोधात बुधवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
मोटार वाहन निरीक्षक संकेतकुमार चव्हाण हे १६ डिसेंबरला भरारी पथकासह गस्त घालत होते. दुपारी अडीचच्या सुमारास फायर ब्रिगेड, गव्हाणपाडा, मुलुंड पूर्व परिसरात ऑर्किड स्कूलची बस (क्रमांक एमएच ०४ एलवाय ६०१८) तपासणीसाठी थांबविण्यात आली. ई-चलन यंत्राद्वारे तपासणी केली असता वाहनाच्या नोंदणीकृत तपशिलात दाखविलेला चेसिस क्रमांक आणि प्रत्यक्ष बसवर कोरलेला चेसिस क्रमांक वेगवेगळे असल्याचे आढळले.
बनावट नंबरप्लेट लावल्याचे उघड
एकाच बसवर दोन भिन्न चेसिस क्रमांक आढळल्याने आरटीओ अधिकाऱ्यांचा संशय बळावला. पुढील तपासणीत या बसची कायदेशीर नोंदणी नसताना बनावट नंबरप्लेट लावून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. या गैरप्रकारामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
८.६६ लाखांची फसवणूक
१. तपासादरम्यान बसचालक माहिती न देता १ पळून गेला. शाळेनेही सहकार्य केले नाही. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी बस ताब्यात घेऊन कुर्ला नेहरूनगर बस आगारात जमा केली. विनानोंदणी वाहन चालविल्याप्रकरणी चालक व मालकाविरोधात चलन काढले असून, सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आला आहे.
२. या प्रकरणात वाहनमालक, संबंधित 3 शैक्षणिक संस्था, बस डीलर तसेच शाळेचे संचालक व प्राचार्य यांनी संगनमताने शासनाची आठ लाख ६६ हजार ४२१ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यात वाहन कर, नोंदणी शुल्क, तपासणी फी आर्दीचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेखी आदेशानुसार संकेतकुमार चव्हाण यांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.