उद्यापासून गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव थेट प्रवास; दोन मेट्रो मार्गांचे आज लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:40 IST2026-04-07T13:34:39+5:302026-04-07T13:40:18+5:30
गर्दीवेळी ५:५० सेकंदाने धावणार ट्रेन

उद्यापासून गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव थेट प्रवास; दोन मेट्रो मार्गांचे आज लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बहुप्रतीक्षित मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो २ बी आणि दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी होणार आहे. मात्र, प्रत्यक्षात बुधवारपासून या दोन्ही मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यातील दहिसर ते काशिगाव मार्गावर गर्दीच्या वेळी दर ५ मिनिटे ५० सेकंदाने गाडी धावणार आहे, तर मंडाले ते डायमंड गार्डन या मार्गावर प्रवाशांना गाडीसाठी ९ मिनिटे ३० सेकंदांची वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका सुरू करण्याची तयारी पूर्ण केली असून आता गुंदवली (अंधेरी पूर्व) ते काशिगाव दरम्यान थेट प्रवास शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. कार्यालयीन दिवसात गुंदवली ते काशिगावदरम्यान मेट्रो ९वर गाडीच्या दरदिवशी २७६ फेऱ्या होणार आहेत तर मंडाले ते डायमंड गार्डनदरम्यान मेट्रो २ बीवर गाडीच्या २०९ फेऱ्या होतील.
२३.६ कि. मी. वर असतील १९ स्थानके
‘मेट्रो २ बी’ मार्गिका २३.६ कि. मी. लांबीची असून त्यावर १९ स्थानके आहेत. यात पहिल्या टप्प्यात मंडाले ते डायमंड गार्डन (चेंबूर) या ५.३८ कि. मी. लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. मेट्रो ९ मार्गिकेची लांबी १३.६ कि. मी. असून त्यावर १० स्थानके असतील. यातील पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव हा ४.४ किलोमीटरचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. तर मेट्रो ७ मार्गिका मिळून काशिगाव ते गुंदवली अशा १९.७९ कि. मी. लांबीच्या मार्गावर गाडी धावेल.
गाड्यांचे वेळापत्रक
- गुंदवली ते दहिसर पू. मेट्रो ७ आणि दहिसर पू. ते काशिगाव मेट्रो ९
- गुंदवली ते काशिगाव
- पहिली गाडी : सकाळी ५:५० (काशिगाव), तर सकाळी ६ (गुंदवली).
- शेवटची गाडी : रात्री १०.३० (काशिगाव), रात्री ११ (गुंदवली).
- मंडाले ते डी. एन. नगर मेट्रो २ बीचा मंडाले ते डायमंड गार्डन, चेंबूर मार्ग.
- पहिली गाडी : सकाळी ६:००
- शेवटची गाडी : रात्री सुमारे १०:१५ (मंडाले स्थानकातून सुटेल), तर १०:३० (डायमंड गार्डन स्थानकातून सुटेल).
- अंधेरी प. ते दहिसर पू. मेट्रो २अ
- पहिली गाडी : सकाळी ५:५५ (अंधेरी प.), सकाळी ६ (दहिसर पू.).
- शेवटची गाडी : रात्री सुमारे १०:३५ (दहिसर पू.), रात्री ११ (अंधेरी प.).
- मेट्रो ९च्या या स्थानकांवर धावणार गाडी : दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव, काशीगाव.
- मेट्रो २ बीच्या या स्थानकांवर धावणार गाडी : मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन.