Join us  

‘त्या’ बाचाबाचीमुळे मिळाले निर्णायक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 2:23 AM

भाजपची दुहेरी प्रचारयंत्रणा; तणावाच्या प्रसंगातून झाला प्रचार

मुंबई : कुलाबा मतदारसंघात भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात तुल्यबळ लढत झाली. नार्वेकरांनी १६ हजारांच्या मताधिक्याने विजयाची नोंद केली. मात्र, काँग्रेसने येथे कडवी लढत दिली. प्रचारादरम्यान काही प्रसंगी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांसमोर आले असताना तणावाचे प्रसंगही निर्माण झाले. भाजपने याच प्रसंगाचा खुबीने वापर करीत मतदारसंघातील व्यापारी वर्ग आपल्या बाजूने उतरेल याची काळजी घेतली.

उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचाराला सुरुवात झाली होती. काँग्रेसने वर्षभरापूर्वीच जगताप यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते आणि स्वत: जगतापांनीही तयारी चालविली होती. भाजपने विद्यमान आमदार राज पुरोहित यांचे तिकीट कापत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीतून आलेल्या नार्वेकरांना उमेदवारी जाहीर केली. राज पुरोहितांचे नाराज समर्थक आणि भाई जगताप यांचे आव्हान या दुहेरी आघाड्यांवर नार्वेकरांना लढत द्यावी लागली. स्थानिक पातळीवर भाजप कार्यकर्ते आणि संघटन मजबूत असल्याचा फायदा नार्वेकरांना मिळाला.

एका प्रचारफेरीदरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूने आक्रमक घोषणाबाजी झाली. काँग्रेस कार्यकर्ते भिडण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत स्थिती आटोक्यात आणली. भाजपने मात्र याचाच फायदा उचलत छुप्या प्रचाराला सुरुवात केली. भाई जगताप यांची कामगार चळवळीची पार्श्वभूमी व्यापारी, गुजराती, मारवाडी मतदारांपर्यंत योग्यपणे पोहोचविण्यात आली. तर, पुरोहितांच्या नाराज समर्थकांच्या कारवायांकडे कानाडोळा करीत त्याचा मुद्दा बनणार नाही याची काळजी घेतली.

शिवाय, हक्काच्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दिसेल अशा पद्धतीने प्रचार करणारे आणि शांतपणे फारसा गाजावाजा न करता थेट मतदारांपर्यंत पोहोचणारे अशा दोन पातळ्यांवर प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. त्याचा अपेक्षित परिणाम साधता आला. राहुल नार्वेकर यांच्या पत्नी आणि बंधू पालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. दोन वॉर्डांतील हा प्रभावसुद्धा नार्वेकरांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला. थेट लढतीमुळे अन्य उमेदवारांना फारशी संधी मिळाली नाही. त्यातल्या त्यात वंचित उमेदवाराने तीन हजार मते घेतली.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019कुलाबाकाँग्रेसभाजपा