खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद

By दीपक भातुसे | Updated: December 23, 2024 06:01 IST2024-12-23T06:00:43+5:302024-12-23T06:01:51+5:30

काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांचा दावा

Tug of war began between ministers from all three parties over who would be the guardian minister of their district | खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद

खातेवाटपाची कसरत संपली, पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच; जिल्ह्यात ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाला पालकमंत्रिपद

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेल्या भरघोस यशानंतर एका महिन्याने राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपासह आकाराला आले. आता तिन्ही पक्षातील मंत्र्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळवण्यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याला पालकमंत्रिपद असा फॉर्म्युला ठरल्याचे महायुतीतील सूत्रांनी सांगितले. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. त्यानंतर १२ दिवसांनी ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी झाला. त्यानंतर १० दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. खातेवाटपासाठी मंत्र्यांना ७ दिवस वाट बघावी लागली. आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना प्रतीक्षा आहे ती पालकमंत्रिपदाच्या वाटपाची. तीनही प्रमुख पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. खातेवाटपातही ते दिसले. पालकमंत्रिपदाची नावे लवकर जाहीर होतील. पालकमंत्रिपदावरून महायुतीत कुठलीही कुरबुर नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये अनेक इच्छुकांमुळे संघर्ष?

रायगड : रायगडमध्ये अजित पवार गटाच्या अदिती तटकरे मागील सरकारमध्ये पालकमंत्री होत्या. त्यावेळीच शिंदेसेनेचे भरत गोगावले हे आपण पालकमंत्री होणार असल्याचा दावा करत होते. मात्र त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. आता तटकरे आणि गोगावले दोन्ही मंत्री आहेत. रायगड जिल्ह्यात शिंदेसेनेचे ३ आणि भाजपचे ३ आमदार आहेत, तर अजित पवार गटाचा एकच आमदार आहे. गोगावले यांनी यावेळीही पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जिल्ह्यावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी अदिती तटकरेंना पालकमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यात भाजपचे ४, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे प्रत्येकी २ आमदार आहेत. जास्त आमदारांच्या फॉर्म्युलानुसार सातारचे पालकमंत्रिपद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. मात्र मागील सरकारमध्ये पालकमंत्री राहिलेले शंभूराज देसाई हे यावेळीही पालकमंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहेत.

छ. संभाजीनगर : मागील सरकारमध्ये शिंदेसेनेचे संदिपान भुमरे आणि ते लोकसभेवर निवडून गेल्यानंतर शेवटचे काही महिने शिंदेसेनेचेच अब्दुल सत्तार हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते. आता शिंदेसेनेचे ६ आणि भाजपचे ३ आमदार आहेत. त्यामुळे पालकमंत्री मीच होणार, असा थेट दावा शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. तर दुसरीकडे अतुल सावे सलग तीन वेळा निवडून आल्याने तेच योग्य असल्याचा दावा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

बीड : बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद पंकजा मुंडेंकडे जाणार की धनंजय मुंडेंकडे याबाबतही उत्सुकता आहे. यापूर्वी मंत्री असताना या दोघांनीही या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले आहे. यावेळी बीडचे तापलेले वातावरण लक्षात घेता धनंजय मुंडेंना पालकमंत्रिपद देण्यास भाजपकडून तीव्र विरोध होत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे पालकमंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक: नाशिक जिल्ह्यात अजित पवार गटाचे ७ आमदार आहेत. त्यामुळे ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याच पक्षाचा पालकमंत्री या नियमानुसार आमच्याच पक्षाला पालकमंत्रिपद मिळावे, असा आमचा दावा असल्याचे अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. भाजपचे नाशिकमध्ये ५ आमदार निवडून आले असल्याने जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडूनही नाशिक पालकमंत्रिपदासाठी आग्रह कायम आहे.

मुंबई : मुंबईत शिंदेसेनेचा एकही मंत्री नाही, तरीही आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता मुंबई शहर किंवा उपनगर जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी शिंदे प्रयत्नशील आहेत. मागील सरकारमध्ये मुंबई शहरची पालकमंत्री म्हणून जबाबदारी भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्याकडे होती, तर उपनगरची जबाबदारी दीपक केसरकर यांच्याकडे होती. यावेळीही मुंबईतील एक जिल्हा आम्हाला मिळावा असा शिंदेंचा आग्रह आहे, मात्र भाजपला दोन्ही जिल्हे आपल्या ताब्यात हवे आहेत.

Web Title: Tug of war began between ministers from all three parties over who would be the guardian minister of their district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.