ठाकरे बंधूंच्या जागावाटपामुळे दादरमध्ये पेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:35 IST2025-12-28T13:34:53+5:302025-12-28T13:35:43+5:30
२०१७ च्या पालिका निवडणुकीत प्रभाग १९४ मधून समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांचा पराभव केला होता.

ठाकरे बंधूंच्या जागावाटपामुळे दादरमध्ये पेच
मुंबई : मुंबईत उद्धवसेना व मनसे युतीची घोषणा केल्यानंतर जागावाटपही अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, दादर विधानसभेतील प्रभाग क्रमांक १९४ व १९२ च्या जागावाटपावरून पेच आहे.
२०१७ च्या पालिका निवडणुकीत प्रभाग १९४ मधून समाधान सरवणकर यांनी महेश सावंत यांचा पराभव केला होता. पक्ष फुटीनंतर सरवणकर शिंदेसेनेत गेले, तर सावंत यांनी दादर-माहीममधून विधानसभा निवडणूक जिंकली. त्यामुळे या प्रभागावर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व उद्धवसेनेचे विधान परिषदेतील आ. सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला आहे. जागवाटपामध्ये उद्धवसेनेने हा प्रभाग स्वत:कडे घेतल्याने शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
किल्लेदारांकडे किल्ला
प्रभाग १९२ हा पूर्वीचा महिला मतदारसंघ आरक्षणानंतर खुला झाल्याने मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी येथून उमेदवारी मागितली. उद्धवसेनेच्या प्रीती पाटणकर येथे निवडून आल्या होत्या. मात्र, किल्लेदार यांच्यासाठी मनसेने येथे प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला. आता जागा मनसेला गेली.किल्लेदार लढवणार असल्याचे स्पष्ट होते.