Join us

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील धक्कादायक चित्र; मनसेने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 11:23 IST

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रातोरात झाडांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं आहे

मुंबई - आरेमधील मेट्रो कारशेडसाठी हजारो वृक्षांची कत्तल करण्यात आली त्यावरुन पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरेंकडून तत्कालीन सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलं. वृक्षांची कत्तल खपवून घेणार नाही असा इशाराच त्यांनी दिला होता. मात्र सध्या पर्यावरण खातं आदित्य ठाकरेंकडेच असतानाच त्यांच्या वरळी मतदारसंघातील चित्र नेमकं उलटं आहे. 

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रातोरात झाडांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अनेक झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. काही वृक्षांना इंजेक्शन देऊन कत्तल केली आहे. याबाबत मनसेकडून महापालिका आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. वरळी सी फेस मार्गावरील कावेरी व इतर सोसायटी आवारातील झाडांच्या रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी करण्यात आली आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी नव्याने बांधण्यात आलेल्या जाहिरात फलकांसाठी ही छाटणी झाल्याचा आरोप मनसेने केला आहे. 

या पत्रात लिहिलंय की, काही झाडांचा कोणत्याही वाहतुकीस अडथळा नसतानाही कापण्यात आली आहे. सोसायटीच्या आवारातील माडाच्या झाडांनाही विषारी इंजेक्शन देवून मारण्यात आलं आहे. याठिकाणी नवीन जाहिरात होर्डिंग्स बसवण्यात आल्याने या झाडांची कत्तल केली असल्याचं मनसेने सांगितले आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी केली आहे. 

इतकचं नाही तर शिवसेनेच्या बड्या नेत्याकडे होर्डिंग्स कंत्राट असल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघातच अशाप्रकारे वृक्षांची कत्तल करण्यात येते हे योग्य नाही असंही मनसेने सांगितले आहे. आरेतील झाडे कापणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतली होती. मात्र पर्यावरण मंत्री असतानाचा त्यांच्या मतदारसंघात अशाप्रकारे झाडे कापल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या प्रकरणात मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने झाडे कापण्याची परवानगी दिली होती का?  इंजेक्शन देऊन झाडं मारणारे कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरं मुंबई महापालिका प्रशासन आणि शिवसेनेला द्यावी लागणार आहेत.   

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेपर्यावरणमनसे