प्रवासी कट्टा! ‘तुंबई’वर कायमचा उपाय शोधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 01:20 AM2019-09-12T01:20:06+5:302019-09-12T01:20:18+5:30

पावसाळ्यात उपनगरी रेल्वेची होणारी बिकट अवस्था ही काही अचानक झालेली नाही. पूर्वी पाणी तुंबायचे; पण पाऊस थांबला की पाण्याचा निचराही तेवढ्याच वेगाने व्हायचा

Traveling Strap! Find a permanent solution to 'Tumbi' | प्रवासी कट्टा! ‘तुंबई’वर कायमचा उपाय शोधा

प्रवासी कट्टा! ‘तुंबई’वर कायमचा उपाय शोधा

Next

ऐन गणेशोत्सवात पावसाने मुंबईला ब्रेक लावला. उपनगरी रेल्वे, लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द कराव्या लागल्याने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचे हाल झालेच; पण मनोभावे मुंबईतील सार्वजनिक गणेशाच्या दर्शनाला जाणाºया भाविकांच्या मार्गातही ‘विघ्न’ उभे राहिले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. पावसाळापूर्व कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रत्यक्षात पाऊस सुरू झाल्यानंतर या कामांचा बोजवारा उडालेला दिसतो. दरवर्षी पाणी तुंबणारी ठिकाणे तीच असतात. मग रेल्वे अभ्यासपूर्ण नियोजन करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना का करीत नाही, असा सवाल ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ या सदराच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलावी
गेल्या काही वर्षांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तरी रेल्वेसेवा कोलमडते. याला सर्वस्वी रेल्वेचा कामचुकारपणा जबाबदार आहे. सरकारी नोकरी असल्याने आपले कोणीच काही करू शकत नाही, ही वृत्ती अधिकाºयांमध्ये बळावत असल्याने त्यांची मुजोरी वाढून रेल्वे सेवा सुरळीत चालण्यासाठी कोणतीच कायमस्वरूपी कामे केली जात नाहीत. त्यामुळे लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मुंबई उपनगरी रेल्वेमुळे सर्वाधिक महसूल मिळत असल्याने ही सेवा खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याविरोधात केंद्रात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठविणे गरजेचे आहे. - कन्हैया नलगोंडा, ठाणे



मूळ दुखण्यावर इलाज करायला हवा
मुंबईत मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचणे, सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, ओव्हरहेड वायर तुटणे, रेल्वेमार्गावर झाड उन्मळून पडणे, अशा अनेक कारणांनी रेल्वेवाहतूक बंद होते. यंदाच्या मोसमात अतिवृष्टी झाल्यामुळे किमान चार वेळा तरी मुंबईत रेल्वेसेवा कोलमडली. मुसळधार पावसामुळे मुंबई उपनगरी रेल्वेसेवेवर परिणाम होतोच; पण लांबपल्ल्यांच्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुळात मुंबईची भौगोलिक रचना सखल आणि खोलगट असल्यामुळे १०० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाल्यावर मुंबईत रेल्वे रुळांसह सर्वत्र पाणी तुंबतेच. मात्र, तुंबणाºया पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या पर्जन्यवाहिनी या ब्रिटिशकालीन असून त्यांची क्षमता आता संपलेली आहे. त्यामुळे २६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी पालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत वेळच्या वेळी रेल्वे हद्दीतील नाल्यांची सफाई करणे, रेल्वेमार्गावरील अधिक पाणी तुंबणाºया जागा निश्चित करून त्या ठिकाणी पाणीउपसा करणारे अधिक पंप बसविणे, रेल्वेने आणि पालिकेने जबाबदारी न झटकता समन्वयाने काम करणे असे उपाय करता येतील. शिवाय दीर्घकालीन उपायांमध्ये मेट्रो आणि मोनो रेल्वेप्रमाणे उपनगरीय रेल्वेमार्गही उन्नत (एलिव्हेटेड) करण्याचा पर्याय आहेच. समस्येच्या मूळ दुखण्यावर इलाज केले नाहीत, तर ७५ लाख लोकल प्रवाशांचे पावसाळ्यात होणारे हाल वर्षानुवर्षे असेच चालू राहणार यात शंका नाही. - प्रदीप मोरे, अंधेरी (पू.)

रेल्वेने कार्यपद्धती बदलण्याची गरज
पावसाळ्यातच नव्हे, तर इतर सर्व ऋतूत उपनगरीय रेल्वे खंडित होते. मध्य रेल्वे मार्ग यात प्रथम क्रमांकावर आहे. रेल्वे प्रशासन निसर्ग, पावसावर खापर फोडून आपल्या अपयशावर पांघरूण घालते. लाखो, करोडो रुपये विकासकामांवर खर्च करीत वर्षभर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र, रेल्वेच्या विस्कळीतपणात काहीच फरक पडत नाही. प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे, याची झलक नुकतीच ‘सीएसएमटी’ स्थानकावर आंदोलन करून दिसली. त्यामुळे रेल्वेने आपल्या कार्यपद्धतीत गंभीरपणे बदल करणे आवश्यक आहे. - अनंत बोरसे, शहापूर

उद्घोषणा करतच नाहीत
नुत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे उपनगरी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. हजारो प्रवाशांना रेल्वे स्थानकावर १० ते १२ तास अडकून राहावे लागले. काही प्रवासी लोकलमध्ये अडकून राहिले होते, तर काही प्रवासी रेल्वे रुळावर चालून पायपीट करीत होते. प्रत्येक प्रवाशांच्या मनात रेल्वे प्रशासनाच्या विषयी राग होता. मात्र, रेल्वेकडून ‘रेल्वे सेवा लवकर सुरू होईल’, असे सांगण्यात येत होते. मात्र, कधी सुरू होईल, हे सांगितले जात नव्हते. किमान ज्या वेळी रेल्वेसेवा कोलमडते, त्या वेळेस तरी प्रवाशांना गाड्यांच्या स्थीतीबाबत योग्य सूचना द्याव्यात.- कमलाकर जाधव, बोरीवली

बेजबाबदार अधिकाºयांवर कारवाई करावी
मुंबईतील रेल्वे अधिकाºयांना कधीच पावसाचा अंदाज येत नाही. रुळांवर पावसाचे पाणी कोठे साठते, गेल्या वेळी कोणती उपाययोजना फोल ठरली किंवा कोणत्या पर्यायांनी पाण्याचा जलद निचरा होण्यास मदत होईल, याबाबत उजळणी करण्याचा मनापासून प्रयत्न होत नाही. रेल्वे प्रशासनाकडून उच्च पातळीवर मुंबईतील पावसाचा, वाढत्या लोकसंख्येचा, स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे झाले आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण अभियंते, कामगार यांना सेवेत रुजू होण्यापूर्वी पूर्ण करणे सक्तीचे करावे. प्रत्येक स्थानक एकमेकांशी हॉटलाइनने जोडले जावे, ज्यामुळे मार्गात खोळंबलेल्या गाडीची माहिती पुढील स्थानकावर पाठवून फलाटांवरील प्रवाशांना लोकलच्या विलंबाच्या/आगमनाच्या सूचना देता येतील, त्यामुळे चेंगराचेंगरी, दुखापती टाळता येतील. रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठांनी गंभीरपणे लक्ष देऊन रेल्वेसेवेतील बेजबाबदार अधिकाºयांवर कारवाई केली, तरच रेल्वेसेवेला चांगले दिवस येतील. - राजन पांजरी, जोगेश्वरी.

अनधिकृत बांधकामे तोडा
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीने रेल्वेसेवा कोलमडली. उपनगरी रेल्वेच्या प्रत्येक स्थानकाजवळ चुकीच्या पद्धतीने बांधकामे झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. नाले, गटारे, नद्या यांची रुंदी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे याचा त्रास रेल्वे प्रवाशांना होत आहे. - मनोहर शेलार, सदस्य, मध्य रेल्वे सल्लागार समिती

कर्तृत्वशून्य रेल्वे
पावसाचा थोडा जोर वाढला की मुंबईत रेल्वेसेवा बंद होते. त्या वेळी रेल्वे अधिकारी मात्र प्रवाशांची फार मोठी काळजी असल्याचे भासवत ‘पाणी ओसरले की अंदाज घेऊन रेल्वे सेवा सुरू करू’ असे सांगत असतात. पाणी ओसरल्यावर सेवा सुरू करणे यात कसले आहे कर्तृत्व? पावसाळ्यात उपनगरी रेल्वेच्या अनेक स्थानकांत वर्षानुवर्षे पाणी साचते हे रेल्वेला ज्ञात असूनही त्या दृष्टीने आजतागायत काहीही उपाययोजना झाल्याचे दिसत नाही. तुफान पाऊस हा निसर्गाचा प्रकोप समजून मुंबईकर, उपनगरी प्रवासी गप्प बसतो. मात्र, रेल्वेनेही आपली जबाबदारी नीट पार पाडलेली नसते, प्रवाशांच्या होणाऱ्या या गैरसोयींकडे रेल्वे गांभीर्याने बघत नसल्याने प्रवाशांना थोडा अधिक पाऊस झाला तरी रेल्वेसेवा बंदचा फटका सोसावा लागतो. ही परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. - मुरलीधर धंबा, डोंबिवली

सिमेंटीकरण कारणीभूत
पावसाळ्यात उपनगरी रेल्वेची होणारी बिकट अवस्था ही काही अचानक झालेली नाही. पूर्वी पाणी तुंबायचे; पण पाऊस थांबला की पाण्याचा निचराही तेवढ्याच वेगाने व्हायचा. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात या शहरात मोकळ्या जागा, मैदाने शिल्लक होती. पावसाच्या पाण्याला वाट मिळावी म्हणून काही अंतराने या गटारांना जोडून सिमेंटचे पाइप टाकण्यात आले; परंतु आज अनेक ठिकाणच्या पाइपांची तोंडे कचºयाने बंद झालेली दिसतात. प्लॅस्टिकच्या पिशव्या त्यात अडकलेल्या दिसतात. साहजिकच पाण्याचा निचरा होत नाही. त्याचा परिणाम थेट रेल्वे वाहतुकीवर होतो. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. - प्रतीक्षा गायकवाड, कळवा

रेल्वेत प्रशिक्षित कर्मचारीच नेमा
रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयांतील रेल्वे अधिकारी, तंत्रज्ञ किंवा प्रत्यक्ष रुळांवर काम करणाºया कर्मचाऱ्यांना मुंबई आणि परिसरातील भौगोलिक परिस्थिती समजावून देणारे प्रशिक्षण प्रत्येकाच्या निवडीअगोदर द्यावे. म्हणजे त्या कर्मचाºयांची येथील हवामानाशी जुळवून घेण्याची मानसिकता तयार होईल. पावसाळ्यात रेल्वे मार्गांत पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीस आलेले अडथळे आपण दूर करायचे आहेत, याची जाणीव होऊन प्रत्येकाकडून निष्ठेने काम केले जाईल. तेथे संघ भावना निर्माण होईल. कामाची जबाबदारी खातेनिहाय वाटून दिल्यास त्यांचा दर्जा सुधारेल. - स्नेहा राज, गोरेगाव


रेल्वे म्हणजे मुंबईकरांची लाइफलाइन. रेल्वे थांबली की मुंबई थांबते. दरवर्षी मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना वाहतुकीचा फटका बसतो. त्यामुळे रेल्वेकडून मान्सूनपूर्व तयारी केली जाते. रेल्वे फाटकातील जमा झालेला कचरा बाजूला करणे, झाडाच्या वाढलेल्या फांद्या कापणे, सिग्नल दुरुस्ती करणे इत्यादी कामे केली जातात. मात्र, तरीही अतिवृष्टीमुळे रेल्वेसेवा ठप्प होते. पाऊस पडला की रेल्वे बिघडते, तसे प्लॅटफॉर्मवरचे इंडिकेटरही बिघडतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम या तिन्ही मार्गावर रेल्वेकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो, असे असतानाही पावसाळ्यात पाणी तुंबतेच. या गोष्टी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कारण रेल्वे बंद पडल्या तर त्याचा फटका देशाच्या आर्थिक राजधानीला बसतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची दरवर्षी ‘तुंबई’ होते, ही आम्हा मुंबईकरांसाठी अत्यंत दुर्दैवी बाब आहे. - स्नेहल सोहनी, भांडुप

Web Title: Traveling Strap! Find a permanent solution to 'Tumbi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे