ई-बाइकविरुद्ध वाहतूक पोलिसांनी थोपटले दंड; अकरा दिवसांत ६७२ बाइक्स केल्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 14:41 IST2024-12-31T14:40:37+5:302024-12-31T14:41:20+5:30
कमीत कमी वेळेत वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याच्या नावाखाली ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयकडून सर्रास नियमभंग होत होते.

ई-बाइकविरुद्ध वाहतूक पोलिसांनी थोपटले दंड; अकरा दिवसांत ६७२ बाइक्स केल्या जप्त
मुंबई : स्वीगी, झोमॅटोप्रमाणे ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ई-बाइकची वेडीवाकडी धोकादायक वळणे नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी ठरताना दिसत आहे. याविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई सुरू आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत अकरा दिवसांत ६७२ ई बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच १८० डिलिव्हरी करणाऱ्या दुचाकी वाहनांवर ई-चलान कारवाई करण्यात आली आहे.
कमीत कमी वेळेत वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याच्या नावाखाली ऑनलाइन सेवा पुरवठादार कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयकडून सर्रास नियमभंग होत होते. त्यात मोटार वाहन कायदा लागू नसल्याने ई बाईकस्वार कर्मचाऱ्यांनी नियमभंगाचा कळस गाठला. सिग्नल न पाळणे, हेल्मेट न वापरणे, नो एंट्रीत शिरणे, चुकीच्या बाजूने दुचाकी चालवणे, मर्यादेपेक्षा वेगाने दुचाकी हाकणे या नियमभंगांबाबत वाहतूक पोलिसांकडे तक्रारी येत होत्या. अलीकडे या तक्रारींचा ओघ वाढला. ई-बाइकना मोटार वाहन कायदा लागू नाही. मात्र, भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार ही कारवाई केली जात आहे.
वाहतूक विभागाने १८ ते २९ डिसेंबर या काळात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत १८१ गुन्हे नोंदवत ६७२ ई-बाइक जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार १८० डिलिव्हरी करणाऱ्या दुचाकी वाहनांवर ई-चलान कारवाई करण्यात आलेली आहे.
हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन
नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करणारे ई-बाइक चालक आढळून आल्यास मुंबई वाहतूक नियंत्रण शाखेच्या हेल्पलाईनवर तक्रार करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.