मुंबईसह कोकणात मुसळधार; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 18:41 IST2020-07-13T18:33:55+5:302020-07-13T18:41:18+5:30
दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किना-यावर कमी दाबाचा पटटा, महाराष्ट्राच्या किना-यावर सोसाटयाचा वारा वाहणार

मुंबईसह कोकणात मुसळधार; तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार
मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कम बॅक केले आहे. रविवारसह सोमवारी पाऊसमुंबई शहर आणि उपनगरात तुरळक ठिकाणी विश्रांती घेत मुसळधार बरसला आहे. पावसाचे हे बरसणे सुरु असतानाच आता मंगळवारसह बुधवारी मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. १४, १५ आणि १६ जुलै रोजी महाराष्ट्राच्या किना-यावर सोसाटयाचा वारा वाहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाने आता चांगला जोर पकडला आहे. विशेषत: मुंबईच्या उपनगरात पावसाचा जोर अधिक आहे. गेल्या दोन दिवसांपासून दाटून येणारे ढग मुंबईला झोडपून काढत असून, विशेषत: रात्रीच्या वेळेला दाखल होणारा पाऊस मुंबईला झोडपून काढत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता, दुपारी ४ वाजता मुंबईत तुरळक ठिकाणी मोठया सरी कोसळल्याचे चित्र होते. काही ठिकाणी मात्र ऊनं देखील पडले होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत २० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. मध्य मुंबईत ४० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला. पूर्व आणि पश्चिम उपनगरात २० ते ४० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. नरिमन पॉइंट, भायखळा, वरळी, माहीम, कुर्ला, बीकेसी, बोरीवली, कांदिवली, पवईसह लगतच्या परिसराचा यात समावेश आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.