Join us
Daily Top 2Weekly Top 5

वयावरुन टोला... सुप्रिया सुळेंनंतर आता रोहित पवारांचेही अजित पवारांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 18:06 IST

बहिण आणि खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. आता, रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. 

मुंबई - राष्ट्रवादीच्या बैठकीला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी अनेक गौप्यस्फोट करतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवृत्तीवरही स्पष्टपणे मत मांडलं. कॉर्पोरेटमध्ये, सरकारी नोकरीत निवृत्तीचं वय ५८ असतं. अधिकाऱ्यांसाठी ६० वर्षे असतं. शेतकरीही आपल्या मुलाकडे मुलाच्या वयाच्या २५ व्या वर्षी जबाबदारी देतो, उद्योगपतीही त्याचप्रमाणे काम करतात, असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयावरुन त्यांनी आता निवृत्ती घ्यायला हवी, केवळ मार्गदर्शन करायला हवं, असं सांगितलं. त्यानंतर, त्यांची बहिण आणि खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. आता, रोहित पवार यांनीही प्रत्युत्तर दिलंय. 

भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर निवृत्त केलं जातं. इथं ८२ झालं, ८३ झालं,  तुम्ही निवृत्त होणार कधी? दोन मे रोजी झालेल्या बैठकीत तुम्ही राजीनामा देतो म्हणून सांगितलं. मग अचानक तो निर्णय मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? असा सवाल अजित पवार यांनी आपल्या भाषणातून शरद पवारांना विचारला. शरद पवार यांच्या वयावरुन अजित पवारांनी परखडपणे भाष्य करत काकांना टार्गेट केलं. त्यानंतर, यशवंतराव चव्हाण सभागृहातील भाषणात सुप्रिया सुळेंनी अजित पवारांवर पलटवार केला. तर, रोहित पवार यांनीही वयावरुन केलेल्या टीकेला उत्तर दिलं. 

२०१९ मध्ये आम्ही जेव्हा राजकारणात आलो होतो, निवडणुकीसाठी उभा राहिलो, तेव्हा शरद पवारांचे वय ८२ होते. त्यावेळी, शरद पवारांमुळेच आमच्यातील सर्वाधिक लोकं निवडून आले आहेत. त्यामुळे, वय हे कारण असू शकत नाही, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या वयावरुन त्यांना थांबण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. 

पवारसाहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की, आता लोकांमध्ये जायचं आहे. त्यासाठी, त्यांनी सुरुवातही केलीय. सातारा, कराड दौरा केल्यानंतर आता नाशिकपासून ते पुढील दौरा करणार आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी आमदारांची गरज नसते, तर उमेदवारांची आवश्यकता असते. सध्या असे अनेक लोकं आहेत, ज्यांच्याकडे ताकद आहे, पण संधी नव्हती. आता या राजकीय घडामोडींमुळे अनेकांना संधी उपलब्ध होईल, असे म्हणत रोहित पवार यांनी नव्याने नेते तयार होतील, असेही सांगितले. 

शरद पवाारांनी गेल्या ६० वर्षांपासून एक विचार कायम ठेवला आहे. त्याच विचाराने आम्ही काम करत आहोत. आता, तुम्ही सातत्याने विचार बदलाल तर, लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडत असतो, असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांवर पलटवार केलाय.  

सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे. "काही लोकांचं वय झालं त्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात. देशात टाटा ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय ८६ आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे साइरस पूनावाला यांचं वय ८४, अमिताभ बच्चन 82, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला साहेबांपेक्षा ३ वर्षांनी मोठे आहेत. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे" असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.   

टॅग्स :अजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवाररोहित पवार