Jayant Patil : "आजच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस ठरला राज्यातील नंबर एकचा पक्ष"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:02 IST2022-01-19T15:40:49+5:302022-01-19T17:02:15+5:30
NCP Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.

Jayant Patil : "आजच्या निकालावरून राष्ट्रवादी काँग्रेस ठरला राज्यातील नंबर एकचा पक्ष"
मुंबई - आज राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे.
या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे असे सांगतानाच पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.