Join us  

आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळणार; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 2:32 PM

मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे.  मोदी सरकारच्या काळात देशातील उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत भर पडत आहेत.

मुंबई: देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी ७ वर्षात हे आश्वासन पाळले नाही.  बेरोजगारीचा उच्चांक मोदींच्या काळात झाला. युवकांची स्वप्ने धुळीस मिळवून त्यांचे भविष्य अंधकारमय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरणार असून पंतप्रधान मोदींना आंदोलनरुपी वाढदिवसाची भेट देणार आहोत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आणि मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिली.

तांबे म्हणाले की, मोदी सरकारने युवकांची घोर फसवणूक केली आहे.  मोदी सरकारच्या काळात देशातील उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत भर पडत आहेत.  ‘फोर्ड’ने नुकत्याच दिलेल्या अहवालात भारतातील उद्योग बंद केल्याने प्रत्यक्ष ४ हजार, तर अप्रत्यक्ष जवळपास ४० हजार लोकांचे रोजगार हिरावले गेले आहेत म्हणून तरुणांची फसवणूक करणाऱ्या मोदींना वाढदिवसाची भेट म्हणून राज्यभर सर्व जिल्हा आणि तालुकास्तरावर आंदोलनरुपी भेट दिली जाणार आहे. मुंबई शहरातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला जाणार असून, मुंबईतील विविध भागांमध्ये आंदोलन केले जाणार असल्याचे अध्यक्ष सिद्दीकी यांनी सांगितले.

राष्ट्रीय भाषण स्पर्धेचे आयोजन-

तरुणांमधून उत्तम वक्ते तयार व्हावेत, यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने ‘यंग इंडिया के बोल’ ही राष्ट्रीय भाषण स्पर्धा होणार आहे. देशभर विविध राज्यात जिल्हा आणि तालुकास्तरावर ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट भाषण करणाऱ्या वक्त्यांना युवक काँग्रेसचे प्रवक्ते बनण्याची संधी दिली जाणार  आहे. या स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. 

महागाई, कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश, बेरोजगारी, शेतकरी आंदोलन, कृषीविरोधी काळे कायदे हे भाषणाचे विषय असतील, असे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सांगितले. यावेळी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी हरपालसिंग, सुबोध कुमार आदी उपस्थित होते.

टॅग्स :नरेंद्र मोदीकर्मचारीनोकरीकाँग्रेस