today we are seeing only modi lipi in country says mns chief raj thackeray | सध्या देशात फक्त मोदी लिपी दिसते; मोडी लिपीवर बोलताना राज ठाकरेंचा टोला
सध्या देशात फक्त मोदी लिपी दिसते; मोडी लिपीवर बोलताना राज ठाकरेंचा टोला

मुंबई: सध्या मोडी लिपी फारशी दिसत नाही. त्यावर कोणी काम करतानादेखील दिसत नाही. आता फक्त देशात मोदी लिपी दिसते, असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी लगावला. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी लेखनाबद्दलच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अच्युत पालव यांच्या कामाचं राज यांनी भरभरुन कौतुक केलं. 

अच्युत पालव यांचं लेखन अतिशय सोपं वाटतं. मात्र ते काम सुरू केल्यावर त्यातल्या अडचणी समजतात. अच्युत पालव यांचं काम पाहून बरं वाटतं. ते अतिशय सोपदेखील वाटतं. मात्र त्यामागे त्यांची कित्येक वर्षांपासूनची मेहनत आहे आणि ती मेहनत मी सुरुवातीपासून पाहतोय, असे कौतुकोद्गार राज यांनी काढले. यावेळी राज यांनी मोडी लिपीच्या आजच्या स्थितीवर भाष्य केलं. अच्युत पालव मोडी लिपीवर तन्मयतेनं काम करत आहेत. त्यासाठी ते अक्षरश: राबत आहेत, असं मनसे प्रमुख म्हणाले. मोडी लिपीवर बोलताना त्यांनी मोजक्या शब्दांत राजकीय भाष्य केलं. सध्या फार कुठे मोडी लिपी पाहायला मिळत नाही. देशात तर केवळ मोदी लिपीच पाहायला मिळते, असं राज यांनी म्हटलं. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे मोडी लिपीत स्वाक्षरी करायचे, अशी आठवणदेखील त्यांनी सांगितली.

सुंदर अक्षर असणं यासारखं दुसरं समाधान नाही. तुम्ही केलेलं लिखाण, शाळा, कॉलेजमधल्या वह्या पन्नाशीत, साठीत गेल्यावर उघडून पाहा. ते अक्षर पाहून तुम्हाला बरं वाटेल, असं राज ठाकरेंनी म्हणाले. डॉक्टरांनी चांगल्या अक्षरात औषधं लिहून द्यायला काय हरकत आहे, असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. आपण काय गिळणार आहोत, ते फक्त डॉक्टरांना आणि केमिस्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतं, असं राज यांनी म्हटलं. तुम्ही कॉम्प्युटरवर कितीही काम करा. ओरिजनल ते ओरिजनलच, अशा शब्दांत राज यांनी शुद्धलेखनाचं महत्त्व उपस्थितांना सांगितलं. माझं अक्षर बरं आहे, याचं श्रेय माझ्या वडिलांना आणि बाळासाहेबांना जातं, असंदेखील राज ठाकरे म्हणाले.

Web Title: today we are seeing only modi lipi in country says mns chief raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.